समुद्रात युद्धनौकेसह हजारो सैनिक, लढाऊ विमानं सज्ज; अमेरिका कोणावर हल्ला करण्याच्या तयारीत ?

अमेरिका हा आर्थिक महासत्ता असणारा देश सध्या कैक कारणांनी चर्चेत असून, सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या या देशाचं नाव एका अतिशय तणावग्रस्त विषयामुळं चर्चेच आलं आहे. व्हेनेज्युएलाशी वाढते ताणावपूर्ण संबंध पाहता अमेरिकेनं आता संघर्षासाठीची पूर्ण तयारी दाखवली आहे. हल्ल्यासाठी आपण सज्ज असल्याचं दाखवत या देशाकडून कॅरेबियन क्षेत्रात ट्रम्प यांच्या देशाकडून युद्धनौका, लढाऊ विमानं तैनात करण्यात आली आहेत. शुक्रवारीच ट्रम्पप यांनी हे लष्कर आणि त्यांच्या हालचाली अतिशय नाटकीयरित्या वाढवत ‘यूएसएस जेराल्ड फोर्ड’ ला लॅटिन अमेरिकेत पाठवण्याचे आदेश दिले.

अमेरिकेकडून उचलली जाणारी ही पावलं पाहता याकडे वॉशिंग्टनमधील आतापर्यंतच्या सर्वाधिक सशस्त्र लष्करी कारवाईच्या दृष्टीकोनातून पाहिलं जात आहे. कॅरेबियन क्षेत्रात अमेरिकी सैन्याची उपस्थिती वाढवण्याच्या ट्रम्प यांच्या योजनेचाच हा भाग समजला जात आहे. ज्यामध्ये 8 वाढीव युद्धनौका, 1 अण्वस्त्र सुसज्ज पाणबुडी, एफ 35 लढाऊ विमान यांचा समावेश आहे.

जागतिक युद्धनिती आणि राजकारणातील जाणकारांच्या माहितीनुसार अमेरिकेच्या मनसुब्यांबाबत चिंतेत भर टाकणारं ठरू शकतं. ट्रम्प यांच्या नेतृत्त्वाखालील अमेरिकी सरकारनं मागील बऱ्याच काळापासून मादुरो यांच्या नेतृत्त्वाअंतर्गत व्हेनेज्युएलातील सरकारवर अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांना शणर देणं आणि लोकशाही संस्थांचं खच्चीकरण करण्याचे गंभीर आरोप केले आहेत. ज्यामुळं आता या दोन देशांमधील तणाव आणखी पेटण्याची शक्यता आहे.

पेंटागनचे प्रवक्ते सीन पर्नेलयांनी X च्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार, ‘युएस साऊथकॉम क्षेत्रात वाढलेल्या अमेरिकी लष्कराच्या उपस्थितीमुळं आमच्या सैन्यात वाढ होईल, जेणेकरून त्यांच्या हालचाली आमच्या लक्षात येतील. अमेरिकी सुरक्षा आणि पश्चिमी गोलार्धातील शांतता भंग करु पाहणाऱ्यांना यामुळं नक्कीच धोका असेल, कारण त्यांना आम्ही वेळीच थांबवू आणि त्यांचा खात्मा करु.’

अमेरिका आणि व्हेनेज्युएलामध्ये वाढलेला हा तणाव पाहता आता एक नवं युद्ध पेट घेणार का? हीच चिंता जगातील इतर राष्ट्रांना सतावत आहे. कारण ठरत आहे ते म्हणजे अमेरिकेकडून करण्यात आलेली जगातील सर्वात मोठ्या लढाऊ नौकेची तैनाती. 2017 मध्ये सेवेत आलेलं युएस देराल्ड फोर्ज हे अमेरिकेचं सर्वात नवं आणि जगातील सर्वात मोठं लढाऊ युद्धपोत असून, ज्यावर 5000 हून अधिक सैनिक, नाविक आणि 75 लढाऊ विमानं तैनात आहेत. कथित स्वरुपात यंदाच्या वर्षी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून अमेरिकी सैन्यानं कॅरेबियन समुद्रात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या जहाजांवर 10 हवाई हल्ले केले होते. ज्यामध्ये 40 जणांचा मृत्या झाला. पेंटागननं यांदर्भातील फार माहिती दिली नसली तरीही मारल्या गेलेल्यांमध्ये अनेकजण व्हेनेज्युएलाचे होते हे मात्र सांगिचलं. दरम्यान व्हेनेज्युएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांनी सातत्यानं ट्रम्प, अमेरिका आपल्याला या पदावरून हटवण्यासाठी कट रचत असल्याचं म्हटल्यानं या तणावात आणखी भर पडली आहे.

वॉशिंग्टनमध्ये मादुरो यांच्या अटकेसाठी मदत करणाऱ्यांना 5 कोटी डॉलर इतकं बक्षीस मिळणार असल्याचं सांगण्यात आलं. तर, अमेरिकेनं त्यांच्यावर अमली पदार्थांची तस्करी आणि गुन्हेगारी कृत्यांना पाठिंबा देणयाचे आरोप लावले. मादुरो यांनी मात्र ते फेटाळून लावले. फक्त व्हेनेज्युएलाच नव्हे, तर कोलंबियासोबतही अमेरिकेच्या नात्यात मीठाचा खडा पडल्यानं आता या तणावाच्या परिस्थितीत अमली पदार्थ तस्करीचा मुद्दा आणखी किती धुमसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.