आशियाई युवा क्रीडा 2025 स्पर्धा बहरीन येथे सध्या सुरु असून यात महाराष्ट्राच्या 16 वर्षीय धावपटू शौर्या अंबुरे हिने रौप्य पदक जिंकलं आहे. शौर्थाने आशियाई युवा क्रीडा स्पर्धेतील 100 मीटर स्पर्धेत हे पदक जिंकलं. अंतिम फेरीत तिने 13.73 अशी सर्वोत्तम कामगिरी केली. आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत भारताने शुक्रवारी ट्रॅक आणि फिल्डमध्ये तीन पदकं जिंकली असून यात शौर्या अंबुरेसह पलाश मंडल आणि जस्मिन कौर यांचाही समावेश होता.
शौर्या अंबुरे ही मूळची ठाण्याची राहणारी आहे. यंदाच्या सीजनमध्ये शौर्या अंबुरेचे हे तिसरे आंतरराष्ट्रीय पदक होते. यापूर्वी तिने राष्ट्रीय ज्युनियर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. तर 18 वयोगटाच्या चॅम्पियनशिपमध्ये तिनं कांस्यपदक जिंकले होते. भारतीय मेडली रिले संघ शौर्या अंबुरे, भूमिका नेहाते, तन्नू, एडविना जैसन यांनी आशियाई युवा क्रीडा 2025 स्पर्धेत 2: 09. 65 वेळेसह नवीन राष्ट्रीय विक्रमासह रौप्य पदक जिंकले. याआधीचा विक्रम 15/07/2007 मध्ये झालेल्या जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धेत ओस्ट्रावा 2: 10.08 वेळेसह प्रस्थापित झाला होता.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकावर पोस्ट करून लिहिलं की, ‘बहरीन येथे होणाऱ्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये 100 मीटर अडथळा शर्यतीत रौप्य पदक जिंकल्याबद्दल महाराष्ट्राच्या शौर्य अंबुरेचे अभिनंदन! 13.73 सेकंदांची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवत, शौर्याने तिच्या उत्कृष्ट कामगिरीने भारत आणि महाराष्ट्राचा अभिमान वाढवला आहे. तिच्या पुढील उज्ज्वल आणि यशस्वी प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा!’.
