शरद पवारांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीला पाठवला भाजपचा कार्यकर्ता?

राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे, काही दिवसांपूर्वीच भाजपकडून प्रत्येक विभागांमध्ये आढावा बैठका घेण्यात आल्या, या बैठकांमध्ये त्या-त्या विभागांमध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणूक तयारीचा आढवा घेण्यात आला आहे, दरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar)गटाकडून देखील आगामी निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत एक महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल हे उपस्थित नव्हते, त्याऐवजी त्यांनी भाजपाच्या एका कार्यकर्त्याला या बैठकीसाठी पाठवल्याचा आरोप सोलापुरातील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी केला आहे. महेश गाडेकर असं या कार्यकर्त्याचं नाव आहे.

दरम्यान याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांनी शहराध्यक्षांना जाब विचारला असता त्यांच्याकडून या संदर्भात खुलासा करण्यात आला आहे, तो कार्यकर्ता राष्ट्रवादीचाच असल्याचं सुधीर खरटमल यांनी म्हटलं आहे. माझं तिकीट कन्फर्म झालं नाही. त्यामुळे मुंबईत माझे मित्र महेश गाडेकर होते, त्यांना मी या बैठकीला पाठवले असं उत्तर यावर खरटमल यांनी दिलं आहे.