१० नोव्हेंबरपर्यंत ऊस दर जाहीर करा अन्यथा आंदोलन

वाळवा,  हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याने प्रतिटन उसाला विना कपात रू ३७५१ दर आणि मागील हंगामातील रू २०० हप्ता अदा करावा, अन्यथा चालू गळीत हंगाम सुरू होऊ देणार नाही, असा ठाम इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. या मागणीचे निवेदन कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी व कार्यकारी संचालक शिवाजी पाटील यांना देण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथे झालेल्या ऊस परिषदेतील ठरावांनुसार ही भूमिका मांडण्यात आली. निवेदनात नमूद केले आहे की, साखरेचा भाव प्रति क्विंटल रू ३८०० पर्यंत गेला असून, इथेनॉल, अल्कोहोल, बगॅस, मोलॅसिस यामधून कारखान्यांनी कोट्यवधींचा नफा कमावला आहे. तरीदेखील शेतकऱ्यांना दर न मिळणे हा त्यांच्या मेहनतीचा अपमान असल्याचे संघटनेने म्हटले आहे. तसेच, वाहतूक कपात केवळ २५ किलोमीटरपर्यंतच मर्यादित ठेवावी आणि त्यापलीकडील खर्च शेतकऱ्यांवर टाकू नये, अशी मागणी करण्यात आली. संघटनेने १० नोव्हेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला असून, तोपर्यंत ऊस दराचा तोडगा न निघाल्यास ‘ऊसतोड बंद ट्रॅक्टर बंद’ अशा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

 यावेळी जिल्हाध्यक्ष महेश खराडे, सूर्यकांत मोरे, संदीप राजोबा, भागवत जाधव, जगन्नाथ भोसले,बाबा सांद्रे, संजय बेले, शिवाजी पाटील, भास्कर पाटील, प्रदीप पाटील, प्रकाश देसाई, प्रभाकर पाटील, प्रवीण पाटील, पांडुरंग शिसाळे, शहाजी पाटील, पंढरीनाथ संकपाळ, बाळासाहेब शिंदे, शिवाजी मोरे, सर्जेराव पाटील, संपतराव भोसले, प्रताप पाटील, नंदकुमार पाटील, रोहित पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भागवत जाधव यांनी सांगितले की, ‘हुतात्मा किसन अहिर कारखान्याने ऊस दराची गोंधळलेली परंपरा मोडावी आणि १० नोव्हेंबरपूर्वी दर जाहीर करावा, अन्यथा कारखानदारांच्या विरोधात तीव्र आंदोलन होईल. कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी कारखानदारांवरच राहील.’