दिवाळीत गावी जाणाऱ्या आणि माघारी येणाऱ्या नागरिकांसाठी पुणे एसटी विभागाने 17 ते 27 ऑक्टोबरदरम्यान अतिरिक्त बस सोडल्या होत्या. या अकरा दिवसांत एसटीच्या 20 हजारांहून अधिक फेऱ्या झाल्या असून, यातून 17 लाख 62 हजारांहून अधिक नागरिकांनी प्रवास केला आहे. या काळात पुणे एसटी विभागाला 23 कोटी 39 लाख रुपये महसूल मिळाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या अकरा दिवसांतील फेऱ्यांमुळे यंदा सव्वापाच कोटी रुपये अधिक महसूल नोंदवला आहे, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
नोकरी, व्यवसाय आणि इतर कामानिमित्त पुण्यात राज्य आणि बाहेरून येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दिवाळीला गावी जाऊन सण साजरा करणाऱ्यांची संख्या लाखोंची आहे. त्यामुळे एसटी विभागाने विदर्भ, मराठवाडा, खान्देश व कोकण भागांसह स्वारगेट, शिवाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड या आगारातून अतिरिक्त बस सेवा चालवली. विशेषतः पुण्यातून विदर्भ आणि मराठवाड्यात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्यामुळे शिवाजीनगर आणि पिंपरी-चिंचवड आगारातून दररोज सहा हजारांहून अधिक अतिरिक्त बस राबवण्यात आल्या.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एकूण बस फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली होती. विशेषतः मराठवाडा भागात गेल्या वर्षी अकरा दिवसांत तीन हजार फेऱ्या झाल्या होत्या, तर यंदा चार हजार 500 फेऱ्या राबवल्या गेल्या. तसेच विदर्भ आणि खान्देश भागातही फेऱ्यांमध्ये वाढ दिसून आली आहे. या अकरा दिवसांत एकूण 17 लाखांहून अधिक नागरिकांनी लालपरी सेवांचा लाभ घेतला.
एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्या लालपरी आणि इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत, ज्यामुळे पुणे विभागासह इतर विभागांतील बसची संख्या वाढली आहे. परिणामी, दिवाळीच्या काळात पुणे विभागातून सर्वाधिक अतिरिक्त बस सेवा चालवण्यात आल्या. यात महामार्गावर लालपरी बसच्या रांगा दिसून येत होत्या. तसेच, गेल्या वर्षीच्या तुलनेत फेऱ्यांमध्ये झालेली वाढ प्रवाशांसाठी व महामंडळासाठी फायदेशीर ठरली. बस वाढविण्यात आल्याने महामंडळाचे उत्पन्न देखील वाढले आहे.
पुणे एसटी विभागाचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी, दिवाळीनिमित्त नागरिकांच्या सोयीसाठी पुणे विभागातील स्वारगेट, शिवाजीनगर व पिंपरी-चिंचवड येथून अतिरिक्त बस सेवा चालवण्यात आल्या होत्या. अकरा दिवसांत 20 हजारांहून अधिक फेऱ्या राबवल्या गेल्या असून, 23 कोटींपेक्षा जास्त महसूल मिळाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 5 कोटी 16 लाख रुपये अधिक महसूल नोंदवण्यात आला आहे,” अशी माहिती दिली.
