लोकसभेला संविधान तसचं आताही…भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मनसे, मविआच्या मोर्चावर काय म्हणाले ?

“भाजप म्हणून भूमिका काय असली पाहिजे ती मांडणं अत्यंत गरजेच आहे. म्हणून कोणी मोर्चा काढावा कोणी काढू नये लोकशाहीत हे सर्व अधिकार प्रत्येकाला असतात. त्यामुळे मविआ एकत्र येऊन मोर्चा काढतेय.हे मोर्चा का काढतायत? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होऊ घातल्यात. प्रत्येक निवडणूक ज्यावेळी समोर येते, त्यावेळेला एक फेक नरेटिव्ह हा कसा तयार करावा, याचं नेहमीच प्रशिक्षण हे त्यांच्या बरोबर असणारी सगळी मंडळी वेगवेगळे एनजीओ हे नेहमीच देत असतात” असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केला.

“लोकसभा निवडणुकीच्यावेळेला सुद्धा देशाबाहेरील एनजीओ काही अशा शक्ती जे हा देश अखंड राहू नये या दृष्टीकोनातून सातत्याने एनजीओ म्हणून संपूर्ण देशामधील असणारी परिस्थिती. इथली असणारी सुरक्षितता. इथला कायदा या सगळ्या गोष्टी अस्थिर कशा करता येतील, यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत होते” असा दावा रवींद्र चव्हाण यांनी केला.

“लोकसभेच्यावेळेला सुद्धा संविधानासंदर्भात असाच फेक नरेटिव्ह तयार झाला, किंबहुना पसरवला. या अशा नरेटिव्हमुळे कुठेतरी समाजामध्ये चुकीच्या पद्धतीने लोकांचा गैरसमज निर्माण करण्याचं काम नेहमीच मविआने केलय. याची अनेक उदहारण ही आपण सर्वांसामोर आहेत. हे सर्व लक्षात घेता कोण कोण एनजीओ यात काम करतात? त्या सर्वांना कशा पद्धतीने आर्थिक पाठबळ मिळतेय या ,सगळ्या गोष्टी जगजाहीर झाल्या आहेत” असं रवींद्र चव्हाण म्हणाले.

“मोदींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात महायुती सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने प्रत्येक घटकाला न्याय कसा देता येईल, या भूमिकेत काम करतात. मध्यंतरीच्या काळात आस्मानी संकट हे शेतकऱ्यांवर आलं. पण हे सरकार मायबाप म्हणून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहिलं. हे आपण ,सर्वांनी पाहिलं. य़ा सर्व गोष्टींबरोबर जाती, धर्म या सर्वामध्ये तिढा निर्माण करण्याचं काम सुद्धा काही मंडळी करत होती” असं रवींद्र चव्हाण म्हणाले.

“समाजातील असणारी व्यवस्था चांगली राहिली पाहिजे. यासाठी सुद्धा महायुतीच्या सरकारने एका चांगल्या पद्धतीने मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल या दोघांना न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये काम केलं. आता आपल्याकडे पर्याय राहिलेला नाही, त्यामुळे एका नवीन पद्धतीने एक नवीन नरेटिव्ह हा आपल्याला तयार करता येऊ शकतो का? याची ट्रायल मोर्चाच्या माध्यमातून मविआ करतेय” असं रवींद्र चव्हाण म्हणाले.