इस्लामपूर येथील रसिका मल्लेश कदम (वय 35, रा. बहे नाका) या विवाहितेचा घातपात करून युवकाने तिला ताकारी (ता. वाळवा) येथे कृष्णा नदीपात्रात फेकल्याचे उघडकीस आले आहे. बुधवारी सायंकाळी बोरगाव (ता.वाळवा) येथील संशयित युवकाने स्वतःहून इस्लामपूर पोलिस ठाण्यात हजर होऊन ही माहिती दिल्याने खळबळ उडाली.
इस्लामपूर पोलिस ठाण्याचे पथक, सांगली येथील आयुष हेल्पलाईनचे पथक दिवसभर रसिका यांचा नदीपात्रात शोध घेत होते. रात्री उशिरा रसिका यांची दुचाकी नदीपात्रातून बाहेर काढण्यात पथकाला यश आले. गुरुवारी पुन्हा शोधमोहीम राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत संशयित युवकाविरोधात गुन्हा दाखल झाला नव्हता.
याबाबत मिळालेली माहिती, रसिका या कुटुंबासमवेत बहे नाका परिसरात राहात होत्या. त्यांना दोन मुले आहेत, तर पती मल्लेश हे कामानिमित्त कर्नाटकात असतात. इस्लामपूर येथील खासगी दवाखान्यात काम करताना रसिका यांची बोरगाव येथील संशयित युवकाशी ओळख झाली होती. त्यातून दोघे वरचेवर भेटत होते. मंगळवारी सायंकाळी रसिका दुचाकी घेऊन बोरगाव येथे संशयित युवकाकडे गेल्या होत्या. त्यावेळी पैशाच्या देवघेवीवरून दोघांमध्ये वाद झाला. संशयिताने रसिका यांना मारहाण केली. रात्री रसिका यांना त्यांच्याच दुचाकीवरून ताकारी येथील पुलावर नेले. पुलावरून त्यांना नदीपात्रात फेकले. त्यानंतर त्यांची दुचाकी नदीत फेकली. यानंतर दुसर्या दिवशी-बुधवारी सायंकाळी तो पोलिस ठाण्यात हजर झाला. पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ, उपनिरीक्षक समाधान घुगे यांच्यासह गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने ताकारी येथे नदीपात्राकडे धाव घेतली. घटनास्थळी सांगली येथील आयुष रेस्क्यू पथकाला पाचारण करण्यात आले.
