उद्या रविवारी म्हणजेच ७ जानेवारीला आ. अनिल बाबर यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. खानापूर, आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त विट्यात रविवार, दि. ७ रोजी सकाळी दहा वाजता शेतकरी आणि कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे.
यात महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि खासदार धैर्यशील माने उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात खानापूर – आटपाडी मतदारसंघातील शेतकरी, जनता आणि कार्यकर्त्यांच्यावतीने आमदार बाबर यांचा सत्कार होणार आहे.
विस्तारित टेंभू योजनेला राज्य शासनाने मंजुरी दिल्यामुळे खानापूर, आटपाडी तालुक्यातील पाण्यापासून वंचित असणारा भाग ओलिताखाली येणार आहे. दुष्काळी भागाला पाणी देण्याचे आमदार अनिल बाबर यांचे स्वप्न यानिमित्ताने पूर्ण झाले आहे.
त्यामुळे दुष्काळी भागातील जनतेमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. मतदारसंघातील जनतेकडून कृतज्ञता म्हणून आमदार बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार होणार आहे. मतदारसंघातील गावा- गावात बाबर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.
रक्तदान शिबिर, नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर, विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केले आहे. त्याचबरोबर बळीराजा कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. येणारा काळ हा मतदार संघातील जनतेसाठी चांगल्या शेतीचा आहे. पिकाचे आणि शेतीच्या उत्पन्नाचे नियोजन केले, तर या परिसरामध्ये अर्थक्रांती होईल, या भावनेने कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.
प्रदर्शनात हे पाहण्यास मिळेल.
प्रदर्शनामध्ये आधुनिक शेती, पारंपरिक शेती, नैसर्गिक शेती तसेच शिवाय कमी उत्पादन खर्चामध्ये जादा उत्पन्न कसे काढता येईल याकडे या प्रदर्शनाच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळणार आहे. शेतीपूरक व्यवसाय, त्यासाठीच्या साधनसुविधा अवजारे प्रदर्शनात असणार आहेत. हे प्रदर्शन फक्त क्रांतीच्या सुरुवातीचा एक भाग आहे. प्रदर्शनात पक्षी, डॉग शो असणार आहे. प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.