वारणा साखर कारखान्याचा 3,544 रुपये दर जाहीर

येथील तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याकडे चालू हंगाम 2025-2026 मध्ये गळितास येणार्‍या उसास प्रतिटन 3425 रुपये दर देणार असल्याची घोषणा वारणा समुहाचे नेते व कारखान्याचे अध्यक्ष आ.

डॉ. विनय कोरे यांनी शनिवारी केली. गाळप झालेल्या उसास एकरकमी पहिला अ‍ॅडव्हान्स प्रतिटन 3425 रुपये देणार असून उर्वरित 119 रुपये हंगाम समाप्तीनंतर देण्याचा निर्णय कारखान्याच्या संचालक मंडळाने घेतल्याचे डॉ. कोरे यांनी सांगितले.

वारणाने ऊस पुरवठादार शेतकर्‍यांना नेहमीच चांगला ऊस दर दिला असून शेतकर्‍यांसाठी अनेकविध योजना राबविलेल्या आहेत. कारखान्याच्या चालू गळीत हंगामात वेळेत गाळप होऊन साखर उतारा चांगला राहण्याचे दृष्टीने शेतकरी सभासदांच्या सहकार्यातून यावर्षीचा 67 वा गळीत हंगाम सहवीज निर्मिती प्रकल्पाच्या सहकार्यातून सुरू झाला आहे. आजपर्यंत सर्व ऊस उत्पादक सभासदांनी व गेटकेन ऊस उत्पादकांनी सुरुवातीपासूनच ऊस गळितास पाठवून मोलाचे सहकार्य केले आहे. याबद्दल आमदार डॉ. विनय कोरे यांच्यासह संचालक मंडळाने सर्वांचे आभार मानले.

शेतकर्‍यांनी यापुढेही पिकविलेला संपूर्ण ऊस वारणा कारखान्यास पुरवठा करून सहकार्य करावे, असे आवाहन आमदार डॉ. विनय कोरे यांनी केले आहे. यावेळी या बैठकीस कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, सर्व संचालक, कार्यकारी संचालक शहाजी भगत, अधिकारी उपस्थित होते.

एफआरपीपेक्षा 144 रुपये जादा दर

यावर्षीच्या शेतकरी संघटना आणि शासन यांच्यात झालेल्या चर्चेप्रमाणे एफआरपी अधिक 100 रुपये देण्याच्या कोल्हापूर फॉर्म्युल्याला मान्यता मिळाली होती. या धोरणाप्रमाणे वारणाची एफआरपी 3399 रुपये 28 पैसे इतकी होत असतानाही 144 रुपये 72 पैसे जादा दर जाहीर केला आहे. तसेच सभासदांना प्रतिमहिना 9 किलो साखर 2 रुपये किलो या अल्प दराने देण्याची ही वारणाची परंपरा यापुढे कायम राहणार आहे.