एकाच दिवशी जन्म, चिमुकल्या आत्ते-मामे भावंडांना एकाच दिवशी काळाने हिरावलं, मृत्यूचं कारण चक्रावणारं

घराबाहेर खेळत असताना जवळच असलेल्या कॅनॉलच्या पाण्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. अवघ्या दोन वर्षांचा मुलगा आणि मुलगी यांना दुर्घटनेत प्राण गमवावे लागले. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात ही मन सुन्न करणारी घटना घडल्याचे समोर आले आहे.

धक्कादायक गोष्ट म्हणजे दोन्ही चिमुकली ही नात्याने एकमेकांची आत्ते-मामे भावंडं होती. दुर्दैवी योगायोग हा की दोघांचाही जन्म एकाच दिवशी झाला होता, अन् त्यांना मृत्यूनेही एकाच दिवशी एकत्रच कवेत घेतलं.

सोमवारी सायंकाळी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील निमगाव येथे ही दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे. स्वास्तिक सचिन राठोड (२ वर्ष) आणि श्रावणी विठ्ठल चव्हाण (वय २ वर्ष ) अशी मृतांची नावे आहेत. दोघं जण खेळताना ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून गावात शोककळा पसरली आहे.

नेमकं काय झालं?

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील निमगाव येथे राठोड कुटुंबीय वास्तव्यास आहे. त्यांच्या घरापासून वीस फूट अंतरावर कॅनॉल आहे. कॅनॉलमध्ये गुडघाभर पाणी जमा झालं होतं. सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास स्वास्तिक राठोड आणि श्रावणी चव्हाण हे दोन वर्षांचे दोघे चिमुकले घराबाहेर खेळत होते. तर कुटुंबातील इतर सदस्य घरातील कामामध्ये व्यस्त होते.

खेळता खेळता दोन्ही चिमुकले कॅनॉलजवळ गेले आणि खड्यात पडले. दोन्ही मुले बराच वेळ दिसत नसल्याने नातेवाईकांची धाकधूक वाढली. शोधाशोध केल्यानंतर नातेवाईकांना दोघांचे मृतदेह पाणी असलेल्या कॅनॉलच्या खड्ड्यात आढळून आले.

चिमकल्याचे मृतदेह पाहताच दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी टाहो फोडला. दोघेही बहीण-भावाची मुलं-मुली होती. दुर्दैवी गोष्ट म्हणजे दोघांचाही जन्म एकाच दिवशी झाला होता, तर आता मृत्यूनेही त्यांना एकाच दिवशी एकाच घटनेत एकत्र गाठले. या घटनेने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वरीष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले होते.