कोल्हापूर शहरात बिबट्याची एन्ट्री! वनरक्षकावर हल्ल्याचा थरारक व्हिडिओ व्हायरल

शहरात पुन्हा एकदा बिबट्याने हजेरी लावली आहे. शहरातील विवेकानंद कॉलेज परिसर आणि वूडलँड हॉटेल भागात बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शनिवारी रात्री उशिरा आणि रविवारी पहाटेपर्यंत बिबट्याने शहराच्या विविध भागात हिंडत राहिल्याने वनविभाग आणि पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री मेरी वेदर ग्राउंड परिसरात काही वाहनधारकांना रस्त्याच्या कडेला बिबट्या दिसल्याचे सांगण्यात आले. सुरुवातीला तो परिसरातील झाडीत दिसला आणि काही वेळाने तो थेट विवेकानंद कॉलेजजवळील वूडलँड हॉटेलमध्ये घुसला. उच्चभ्रू वस्तीत घडलेल्या या घटनेने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली.

जुन्या घटनेची आठवण ताजी

यापूर्वीही कोल्हापूर शहरात अशा घटना घडल्या आहेत. १ जानेवारी २०१५ रोजी रुईकर कॉलनीत बिबट्या दिसला होता. त्यावेळी त्याला पकडताना त्याचा मृत्यू झाला होता. तसेच डिसेंबर १९९५ साली कसबा बावडा परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एका तरुणीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या नव्या घटनेने जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत.

सध्या वनविभागाचे पथक बिबट्याला जिवंत पकडण्यासाठी प्रयत्न करत आहे. परिसरात पिंजरे लावण्यात आले असून नागरिकांनी घाबरू नये, पण सतर्क राहावे, असे आवाहन वनअधिकाऱ्यांनी केले आहे.