जुगार अड्ड्यावर छापा; ४५ जुगार खेळणाऱ्या विरुध्द् गुन्हा दाखल, १ कोटी २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

पंढरपूर – सांगोला तालुक्यातील कोळा येथे जुगार खेळला जात असल्याची माहिती येथील उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे यांना मिळाली.

त्यांनी पोलीस पथकासह त्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी जुगार खेळत असलेल्या ४५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाई मध्ये रोख रक्कम, चारचाकी, दुचाकी वाहने, मोबाईल असा सुमारे एकुण १ कोटी १९ लाख १५ हजार ७७७ रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे.

या कारवाई संदर्भातील पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, मौजे कोळा येथील शेडनेटच्या मध्ये लाकडी ६ टेबलवर गोलाकार करून जुगार खेळण्याकरीता आलेल्या इसमांकडे दुचाकी वाहने, चारचाकी वाहने, रोख रक्कम, जुगार खेळण्याकरीता वापरात आणलेली रक्कम, जवळ बाळगलेले मोबाईल, जुगार साहित्य, ५२ पानी पत्याचे डाव, पत्राशेड/शेडनेट मध्ये असलेले खुर्चा, टेबल, फ्रिज, गॅस सिलेंडर व शेगडी इत्यादी साहीत्य जप्त करण्यात आले आहे.

दरम्यान सांगोला पोलीस ठाण्यात ४५ जुगार खेळणा-या इसमां विरुध्द् महाराष्ट्र जुगार कायदा १८८७ कलम ३(१) ४ व ५ प्रमाणे सांगोला पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि.नंबर ८८२/२०२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असल्याचे दिसून येत आहे. या छाप्यामुळे सांगोला तालुक्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

जप्त करण्यात आलेल्या मालाचा सविस्तर तपशील –

जप्त करण्यात आलेल्या माला मध्ये १) रोख रक्कम ४,१७,५७७/- २) टेबल, खुर्च्या, जुगार खेळण्याचे साहित्य, फ्रिज, पत्यांचे डाव असलेले बॉक्स्, इ.साहित्य व मोबाईल फोन किंमत रुपये -९,३८,२०० /- रुपये ३) ११ चारचाकी वाहने किंमत रुपये ९६,००,०००/- ४) १४ दुचाकी वाहने किंमत रुपये – ९,६०,०००/- असा एकुण १,१९,१५,७७७ रुपये (अक्षरी एक कोटी एकोणीस लाख पंधरा हजार सातशे सत्याहत्तर रुपये) चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

रविवारी रात्री केली कारवाई –

येथील उपविभागीय पोलिस अधिकारी तथा प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ५ पोलीस अधिकारी व २५ पोलीस यांच्या पथकाने रविवारी (ता.९) रात्री नऊ वाजता कोळा येथे सुरू असलेल्या जुगार अड्यावर छापा टाकला. यावेळी तेथे जुगार खेळत असलेल्या ४५ जणांना ताब्यात घेतले. पोलीस येताच या मधील तीनजण पळून गेले. दरम्यान त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे यांनी दिली.

यापूर्वी २९ ऑगस्ट रोजी देखील केली होती कारवाई –
यापूर्वी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे यांनी २९ ऑगस्ट रोजी सांगोला तालुक्यात्तील सोनंद येथे जुगार अङ्ख्यावर छापा टाकून ५० जणांना ताब्यात घेतले होते, तर २ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. सांगोला तालुक्यात अनेक गावात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. याकडे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे यांनी लक्ष केंद्रित केले असल्याचे दिसून येत आहे.