शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नियोजित सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. सीईटी सेलतर्फे शुक्रवारी (ता. २१) यासंदर्भात सूचनापत्र जारी केले.
त्यानुसार मार्च ते मेदरम्यान टप्प्याटप्प्याने अभ्यासक्रमनिहाय सीईटी परीक्षा घेतल्या जातील. यंदा प्रथमच एमएचटी-सीईटी आणि एमबीए या शिक्षणक्रमासाठी प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांना सीईटीच्या दोन संधी उपलब्ध असतील.
राज्यातील विविध व्यावसायिक महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असलेल्या पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेशासाठी सीईटी ही प्रवेश परीक्षा घेतली जाते. सीईटी सेलतर्फे या परीक्षांचे आयोजन केले जाते. संगणकावर आधारित (कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट) या परीक्षेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी नोंदणी करणे आवश्यक असते. विद्यार्थ्यांना परीक्षांच्या तयारीला वेळ मिळावा, परीक्षेच्या तारखांनुसार इतर शैक्षणिक नियोजन करणे सुलभ व्हावे, या अनुषंगाने सीईटी सेलने परीक्षांच्या संभाव्य तारखांची घोषणा केली आहे.
काही दिवसांपूर्वी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे जेईई मेन्सच्या धर्तीवर यंदापासून एमएचटी-सीईटी (पीसीएम आणि पीसीबी ग्रुप) तसेच एमबीए सीईटी या परीक्षा दोन सत्रांमध्ये घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना या परीक्षांच्या दोन संधी उपलब्ध राहणार असून, यापैकी सर्वोत्तम कामगिरी असलेल्या गुणांचा पुढील प्रवेशप्रक्रियेत विचार केला जाईल. संभाव्य वेळापत्रकानुसार मार्चच्य अंतिम टप्प्यात परीक्षांना सुरुवात होणार असून, टप्प्याटप्प्याने मेपर्यंत सीईटी परीक्षांचे आयोजन केले जाईल.
अशा आहेत अभ्यासक्रमनिहाय परीक्षेच्या संभाव्य तारखा २५ मार्च- एम.पी.एड., एम.एड. आणि एमएचएमसीटी (हॉटेल मॅनेजमेंट) २७ ते २९ मार्च- बी.एड. (जनरल व स्पेशल), बी.एड. इलेक्ट. ३० मार्च- एमसीए १ व २ एप्रिल- एलएल.बी. (३ वर्षे कालावधी) ४ ते ७ एप्रिल- बी.पी.एड. ५ एप्रिल- बी. डिझाइन (बॅचलर्स ऑफ डिझाइन) ९ एप्रिल- बी.एड.,-एम.एड. (संयुक्त पदवी) १० एप्रिल- फाइन आर्टस् अभ्यासक्रम (एएसी सीईटी) २८ ते ३० एप्रिल- बीएचएमसीटी (हॉटेल मॅनेजमेंट, बीबीए/बीसीए/बीएमएस/बीबीएम ६ व ७ मे- बी.एस्सी. (नर्सिंग) ८ मे- एलएल.बी. (५ वर्षे कालावधी)
एमएचटी-सीईटी (अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रम) ः पहिले सत्र ः पीसीएम ग्रुप- ११ ते १९ एप्रिल. पीसीबी ग्रुप- २१ ते २६ एप्रिल, दुसरे सत्र ः पीसीएम ग्रुप- १४ ते १७ मे. पीसीबी ग्रुप- १० व ११ मे. एमबीए सीईटी ः पहिले सत्र- ६ ते ८ एप्रिल, दुसरे सत्र- ९ मे
