”भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील कोट्यवधी दलित, शोषित आणि उपेक्षित समाजाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देत आधुनिक भारताची पायाभरणी केली,” असे गौरवोद्गार आमदार जयंत पाटील यांनी काढले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन आणि क्रांतिसिंह नाना पाटील स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी तहसील कार्यालयासमोरील आंबेडकरांच्या पुतळ्याचे, तसेच पंचायत समितीतील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाला प्रा. शामराव पाटील, देवराज पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, आनंदराव मलगुंडे, भगवान पाटील, खंडेराव जाधव, अरुण कांबळे, शाकीर तांबोळी आदी उपस्थित होते.
