टीम इंडियाने अंडर 19 वनडे आशिया कप 2025 स्पर्धेतील पाचव्या सामन्यात निराशा केली आहे. टीम इंडियाचे फलंदाज कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसमोर अपयशी ठरले आहेत. त्यामुळे टीम इंडियाला पूर्ण 49 ओव्हरही खेळता आलं नाही. पावसामुळे बाधित झालेल्या या 49 ओव्हरच्या सामन्यात पाकिस्तानने टीम इंडियाला 46.1 ओव्हरमध्ये 240 रन्सवर ऑलआऊट केलं. या महत्त्वाच्या सामन्याची क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा होती. तसेच टीम इंडियाची पहिले बॅटिंग असल्याने चाहत्यांना वैभव सूर्यवंशी आणि कॅप्टन आयुष म्हात्रे या दोघांकडून मोठ्या खेळीची आशा होती. मात्र दोघांनीही निराशा केली.
टीम इंडियाची स्टार जोडीकडून निराशा
यूएई विरुद्ध 171 धावा करणाऱ्या वैभवला पाकिस्तान विरुद्ध दुहेरी आकडाही गाठता आला नाही. वैभव 5 धावा करुन आऊट झाला. तर आयुष म्हात्रे याला चांगली सुरुवात मिळाली. मात्र आयुषला मोठी खेळी करता आली नाही. आयुषने 38 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. मात्र एरॉन जॉर्ज आणि कनिष्क चौहान या दोघांनी केलेल्या निर्णायक खेळीमुळे टीम इंडियाला 240 धावांपर्यंत पोहचता आलं. त्यामुळे आता भारतीय गोलंदाज या धावांचा यशस्वी बचाव करण्यात यशस्वी ठरतात का? हे निकालानंतर स्पष्ट होईल.
एरॉन-कनिष्कची निर्णायक खेळी
टॉप ऑर्डरमध्ये वैभव व्यतिरिक्त वेदांत त्रिवेदी यालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. विहान मल्होत्रा याने 12 धावा केल्या. तर एरॉन जॉर्ज याने पाकिस्तानच्या गोलंदाजांना सडेतोड उत्तर देत 85 धावांची खेळी साकारली. एरॉनने या खेळीत 12 चौकार आणि 1 षटकार लगावला. विकेटकीपर अभिग्यान कुंदु याने 22 तर हेनिल पटेल याने 12 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. तर कनिष्क चौहान याने दिलेल्या योगदानामुळे टीम इंडियाला 200 पार मजल मारता आली. कनिष्कने 100 च्या स्ट्राईक रेटने 3 सिक्स आणि 2 फोरच्या मदतीने 46 धावा केल्या. तर इतरांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले.
टीम इंडियाच्या 240 धावा, पाकिस्तान जिंकणार का?
पाकिस्तानतकडून एकूण 6 जणांनी बॉलिंग केली. त्यापैकी हुजेफा अहसान याचा अपवाद वगळता इतर 5 गोलंदाजांनी विकेट्स घेतल्या. मोहम्मद सय्यम आणि अब्दुल सुभान या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. निकाब शफीक याने 2 फलंदाजांना बाद केलं. तर अली रझा आणि अहमद हुसैन या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली. त्यामुळे आता टीम इंडियाचे गोलंदाजही सरस बॉलिंग करत पाकिस्तान विरुद्ध विजय मिळवून देणार का? याकडे भारतीय चाहत्यांचं लक्ष लागून आहे.
