राजकीय वर्तुळात ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्यासाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा आपला बालेकिल्ला शाबूत राखत विरोधकांना धूळ चारली आहे. “क्या बडा तो सबसे दम बडा… आणि सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील नाव सांगणार नाही,” या त्यांच्या गाजलेल्या आव्हानाची प्रचिती नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीच्या निकालातून आली आहे. याचेच पोस्टर ईश्वरपूर मध्ये लागले आहेत.
राज्यातील नगरपरिषद आणि नागरपंचायतींचे २१ डिसेंबर रोजी निकाल लागले. या निकालानंतर सांगलीच्या ईश्वरपूर नगरपरिषद निवडणुकीत जयंत पाटील यांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपासह महायुतीने तगडी फिल्डिंग लावली होती.
दिग्गज नेत्यांची फौज आणि रणनीती आखून पाटील यांना घेरण्याचा प्रयत्न झाला. तर अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने २३ जागांवर दणदणीत विजय मिळवत विरोधकांची अक्षरशः हवा काढून घेतली.
विजयानंतर इस्लामपूर शहर आणि राजारामबापू कारखाना परिसरात कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात बॅनर्स लावले आहेत. यावर जयंत पाटील यांचे “सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील नाव नाही” हे वाक्य मोठ्या अक्षरात झळकत आहे. हे फलक सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत असून नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
