आदित्य ठाकरे आजपासून दोन दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर 

शिवसेना नेते आदित्य ठाकरे उद्यापासून दोनदिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. आगामी लोकसभा तसेच हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सुरु असलेली सुंदोपसुंदी आणि कोल्हापूर जागेसाठी उमेदवार या सर्व पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांचा दौरा महत्त्वपूर्ण असेल.

आदित्य ठाकरे यांचा कोल्हापूर दौरा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात आला होता. मात्र, आता आज (9 जानेवारी) आणि उद्या असा दोन दिवस दौरा असणार आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी दौऱ्याची माहिती दिली आहे.

दौरा यशस्वी करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची विश्रामगृहावर बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला विजय देवणे यांच्यासह शहराध्यक्ष सुनील मोदी तसेच पदाधिकारी उपस्थित होते. नियोजित दौऱ्यात आदित्य ठाकरे यांच्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शहरात आणि हातकणंगले मतदारसंघात अशा दोन जाहीर सभा होणार आहेत.

आज दुपारी दोन वाजता आदित्य ठाकरे यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते गारगोटीला रवाना होतील. दुपारी 3 वाजता हुतात्मा क्रांती चौक गारगोटीत जाहीर सभा होणार आहे.

त्यानंतर सायंकाळी 6 वाजता मिरजकर तिकीट कोल्हापुरात जाहीर सभा होईल. त्यानंतर कोल्हापुरात मुक्काम असेल. दुसऱ्या दिवशी बुधवारी यशवंत मंगल कार्यालय, हुपरी येथे मेळावा होईल.

आदित्य ठाकरे यांच्या या दोनदिवसीय दौऱ्यात कोल्हापूर लोकसभा आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होणार का? याची चर्चा आहे. राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी सडकून टीका केली होती.

यानंतर त्यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आदित्य यांचा दौरा होत असल्याने हा वाद मिटवणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. लोकसभेच्या आडून विधानसभेसाठी काही संकेत मिळणार का? याचीही चर्चा आहे.