मागील लेखामध्ये भूगोलाच्या मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपरमधील अभ्यासक्रम आपण पाहिला आणि या अभ्यासक्रमाचे तयारीच्या दृश्टीने विश्लेषणही पाहिले. या लेखामध्ये उपघटक निहाय तयारी कशी करावी ते पाहू.
जगाचा भौतिक भूगोल व त्याची ठळक वैशिष्ट्ये
जगाच्या भौतिक भूगोलाची ठळक वैशिष्ट्ये अभ्यासक्रमात समाविष्ट केलेली आहेत. आर्थिक भूगोलातील मुद्दे वेगवेगळ्या पेपर्समध्ये त्या त्या विषयाच्या अनुषंगाने समाविष्ट केलेले आहेत. इथे ठळक वैशिष्ट्ये’ कोणती आणि कशी अभ्यासायची ते पाहू. आयोगाला भौगोलिक वैशिष्ट्यांची तुम्हाला माहिती आहे का यापेक्षा त्यांचे महत्त्व तुम्हाला कळते का हे शोधण्यात जास्त रस असणार आहे. त्यामुळे ठळक भौगोलिक घटकांचे स्वरूप समजून घेण्याबरोबरच त्यांचे ‘आर्थिक’, ‘मानवी अस्तित्व’ व ‘पर्यावरण’ याबाबतीतील भूमिका व महत्त्वही अभ्यासायचे आहे. उदा. रॉकी व अँडीज पर्वत अमेरिका खंडाच्या पश्चिमेलाच का निर्माण झाले या बरोबरच त्यांच्यामुळे खंडाच्या हवामानावर, मानवी जीवनावर व अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम झाला याबाबत प्रश्न विचारला जाण्याची जास्त शक्यता आहे. यासाठी बेसिक अभ्यास गरजेचा आहेच.
महत्त्वाचे पर्वत, मैदानी, पठारी, किनारी प्रदेश व वाळवंटे हे प्राकृतिक प्रदेश आणि हवामान प्रदेश (उदा. विषुववृत्तीय) यांची वैशिष्ट्ये नकाशा समोर ठेवून अभ्यासायची आहेत. या वैशिष्ट्यांमुळे हवामान आणि मानवी जीवनावर नेमका कसा परिणाम झाला आहे आणि मानवी हस्तक्षेपामुळे त्यांवर काय परिणाम झाला आहे या दोन्ही बाजू समजून घ्यायच्या आहेत.
प्राकृतिक / भौगोलिक स्वरूपे, तत्त्वे व त्यांचे स्थान हा भौतिक भूगोलातील पारंपरिक मुदा आहे. पण या भौगोलिक बाबींच्या फक्त स्वरूपाचा अभ्यास इथे अभिप्रेत नाही. त्यांच्या स्थान निश्चितीची कारणे समजून घ्यायला हवीत. त्यानंतर महत्त्वाच्या बाबींमधील बदन कारणे, समस्या, परिणाम व उपाय या मुद्यांच्या आधारे अभ्यासायचा आहे. उदा. आर्क्टिक खंडावरील बर्फाच्या अस्तित्वाची कारणे, सध्या बर्फ वितळण्याचा वेग वाढल्यामुळे होणारे बदल, त्याची कारणे, परिणाम, उपाय असा अभ्यास अपेक्षित आहे. अशाच प्रकारे विशिष्ट वनस्पती व प्राणी ठरावीक प्रदेशातच आढळण्याची कारणे, त्यांच्या संख्येमध्ये होणारे बदल,त्याची कारणे. परिणाम व उपाय यांचा अभ्यास करायचा आहे. यासाठी आयसीएसई बोर्डाचे पर्यावरणाचे पाठ्यपुस्तक महत्त्वाचे आहे. चर्चेतील विषय बारकाईने पाहावेत.
नैसर्गिक साधनसंपत्तीचे जगभरातील वितरण
नैसर्गिक साधनसंपत्तीचे जगभरातील वितरण अभ्यासताना खनिज तेल, नैसर्गिक वायू, कोळसा, खनिजे, पाणी, कृषियोग्य जमीन यांची उपलब्धता, मागणी, समस्या, परिणाम व त्याबाबतीतील चालू घडामोडी या बाबींचा अभ्यास आवश्यक आहे. विशेषतः भारतीय उपखंड व दक्षिण आशिया या क्षेत्रातील साधनसंपत्तीवर भर द्यायला हवा. या संसाधनांच्या विशिष्ट क्षेत्रातील उपलब्धतेमुळे होणारे भारतावरील परिणाम, समस्या, उपाय तसेच यामुळे उद्भवणारे आर्थिक, राजकीय, सामरिक मुद्दे यांचा व्यवस्थित अभ्यास करायला हवा.
हिमनदीपासून समुद्रापर्यंतचे विविध प्रकारचे पाण्याचे साठे हा imp मुद्दा आहे. प्रत्येकाची वैशिष्ट्ये, मानवी व पर्यावरणीय दृष्टिकोनातून महत्त्व, होणारे बदल, समस्या, कारणे, परिणाम व उपाय असा सर्वस्पर्शी अभ्यास गरजेचा आहे.
खडकांचे, मृदेचे व वनांचे प्रकार, त्यांची वैशिष्ट्ये तसेच जैवविविधता आणि मानवी अस्तित्वाच्या दृष्टीने व आर्थिक महत्त्व समजून घ्यायचे आहे. त्यांच्या वितरणामुळे होणारे परिणाम, समस्या, उपाय यांचाही अभ्यास गरजेचा आहे.
उद्योगांची स्थाननिश्चिती
भारतातील ठराविक उद्योगांची स्थाननिश्चिती. तिची कारणे, परिणाम, समस्या, उपाय या अनुषंगाने अभ्यासायची आहेच, पण इथे स्थानविशिष्ट उद्योगांचा वापर भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये परिणामकारकपणे कसा करता येईल ही बाजूही विचारात घ्यावी लागेल. उदा. ताग उद्योग, हस्तोद्योग, पर्यटन इ. जॉग्राफिकल इंडिकेशन ही संकल्पना या दृष्टीने लक्षात घ्यावी. याबाबतच्या चालू घडामोडींवर आणि चर्चावर बारकाईने लक्ष ठेवायला हवे.
भौगोलिक घटना/प्रक्रिया
महत्त्वाच्या भौगोलिक घटना/प्रक्रिया अभ्यासताना कारणीभूत घटक, परिणाम, नियंत्रणातील गोष्टी आणि समस्या उद्भवल्यास त्यावरील उपाय हे मुद्दे पाहायला हवेत, याबाबत उमेदवाराचे स्वतःचे मत, सुचलेले उपाय पाहण्यात आयोगाला रस असू शकतो. त्यामुळे काही महत्त्वाच्या घटना घडल्या असल्यास त्यांवरील वृत्तपत्रीय व ‘चॅनलीय’ (पण गंभीर) चर्चावर लक्ष असू द्यावे.
मान्सूनची निर्मिती हा पेपर-४ साठीही मूलभूत महत्त्वाचा मुद्दा आहे. निर्मितीच्या प्रक्रियेबाबत विचारून मग पुढे एखादा complex मुद्दा विचारला जाऊ शकतो. त्यामुळे सगळ्या मुद्यांच्या परिपूर्ण अभ्यास गरजेचा आहे.
भूकंप, सुनामी, ज्वालामुखी हालचाली, चक्री वादळे इत्यादी भौगोलिक घटनांचा अभ्यास आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीकोनातून अभ्यास आवश्यक आहे. अशा घटना घडू शकणारी (Prone) ठिकाणे, आपत्ती व्यवस्थापनासाठी होणारे प्रयत्न, आगाऊ सूचना, प्रतिबंधासाठीच्या उपाययोजना यातील नवे प्रयोग, केस स्टडीज् यांची माहिती असायला हवी.
भूगोलाचा अभ्यास करताना नकाशे हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. नकाशावर आधारित प्रश्न हा पूर्व परीक्षेचा भाग आहे. मुख्य परीक्षेत त्याचा फारसा वापर होत नाही किंवा नकाशावर आधारित थेट प्रश्न येत नाहीत हे खरे आहे. पण आर्थिक आणि पर्यावरणीय दृष्टीकोनातून भूगोलाचा अभ्यास नकाशा समोर ठेवून केला तरच आणि तरच चांगली तयारी शक्य आहे. उदाहरणार्थ केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील बहुतांश मोठी वाळवंटे ही खंडांच्या पश्चिम दिशेलाच का विकसित झाली आहेत? हा प्रश्न. नकाशा समोर ठेवून वाळवंट या प्राकृतिक प्रसेशाचा संकल्पनात्मक अभ्यास केलेला असेल तरच अशा प्रश्नाचे वर्णनात्मक स्वरुपात उत्तर लिहीणे शक्य आहे. उद्योगांची स्थान निश्चिती,असो किंवा नैसर्गिक साधनसंपत्तीचे वितरण नकाशाच्या आधारे तथ्ये आणि वस्तुनिष्ठ माहिती अभ्यासरी असेल तरच विश्लेषणात्मक उत्तरे लिहीणे शक्य आहे.
