महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. प्रस्तुत परीक्षा दिनांक २८ सप्टेंबर, २०२५ रोजी राज्यातील ३७ जिल्हाकेंद्रांवरील ५२४ उपकेंद्रांवर उपकेंद्रांवर घेण्यात येणार होती. मात्र, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पुरजन्य परिस्थितीमुळे अनेक जिल्ह्यातील विविध गांवाचा, तालुक्यांचा एकमेकांशी संपर्क तुटलेला आहे. त्यामुळे आता ही परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार ९ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार असल्याचे, आयोगाकडून शुद्धिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने २८ सप्टेंबरला राज्याच्या ३६ जिल्हा केंद्रांवर राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात येणार होत्या. एमपीएससीने अभ्यासक्रमात बदल केल्यानंतर पहिल्यांदाच ही परीक्षा होणार आहे. मात्र, राज्यभर असलेल्या पूर परिस्थितीमुळे तूर्तास ही परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी विद्यार्थ्यांसह अनेक संघटनांचे प्रतिनिधी आणि राजकीय नेते करत होते. त्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून आपल्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
राज्यातील हवामान खात्याने पुढील काही दिवसांत अतिवृष्टीचा इशारा दिला असून अशा परिस्थितीत कोणताही उमेदवार परीक्षेपासुन वंचित राहू नये यासाठी शासनाने पत्र क्रमांक मलोआ-११२५/प्र.क्र.२३६/मलोआ, दिनांक २६ सप्टेंबर, २०२५ अन्वये केलेल्या विनंतीनुसार प्रस्तुत परीक्षा नियोजित तारखेस न घेता पुढे ढकलण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे. सदर निर्णयानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५, दिनांक २८ सप्टेंबर, २०२५ ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच दिनांक ९ नोव्हेंबर, २०२५ रोजी घेण्यात येईल. परीक्षेच्या दिनांकातील बदलामुळे दिनांक ९ नोव्हेंबर, २०२५ रोजी घेण्यात येणारी पूर्वनियोजित महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ चा सुधारित दिनांक शुद्धिपत्रकाद्वारे स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
