पेठ (ता. वाळवा) येथील तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावर ग्रामपंचायतीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या ‘रास्ता रोको’, मोर्चाला महिला, ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बाजारपेठेतून सुरू झालेला हा मोर्चा पेठ नाक्यावरील राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाजवळ थांबवण्यात आला.
आंदोलनात गावातील सर्व भागांतील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ॲड. एस. यू. संदे यांनी गावातील पाणीप्रश्नावर मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्या शेटे, सुनीता देशमाने, मंगल कदम, संगीता पाटील यांनी भूमिका मांडली. राजारामबापू कारखान्याचे संचालक अतुल पाटील म्हणाले की, पूर्वीची योजना वारणा नदीवरून असताना तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी मूळ कृष्णा नदीवरील जॅकवेलमधून पाणी घेण्याचा निर्णय घेतला. तसेच १९७८ मध्ये १२ इंची असलेली मूळ पाईपलाईन २०१८ मध्ये ८ इंची करण्यात आली, यामागे संशयास्पद बाबी असल्याचा आरोप त्यांनी केला.
गावातील अंतर्गत पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात आलेले पाईप्स अत्यंत निकृष्ट असून दर आठवड्याला वेगवेगळ्या भागात गळती होत असल्याचे त्यांनी नमूद केले. कोणतीही तांत्रिक पाहणी न करता कार्यालयात बसूनच सर्वेक्षण करून ही योजना राबवण्यात आल्याने ती अपयशी ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच गावाची विद्यमान लोकसंख्या, शेजारील दोन गावांची लोकसंख्या व पेठ हे रहदारीचे केंद्र असल्याने असलेली तरंगती लोकसंख्या गृहीत न धरता घाईघाईने योजना राबवण्यात आली.
योजनेचा आर्थिक बोजा किती येईल, याचा कोणताही अभ्यास न करता अमलात आणण्यात आली. सध्या वीज बिल, कामगार खर्च, टीसीएल, तुरटी व देखभाल खर्च मिळून वार्षिक ८० लाख रुपयांचा बोजा ग्रामपंचायतीवर पडत आहे. शंभर टक्के वसुली झाली, तरी फक्त ५३ लाख रुपये जमा होत असून उर्वरित सुमारे ३० लाख रुपयांचा तुटीचा भार ग्रामपंचायतीला सहन करावा लागत आहे. परिणामी विकासकामांचा निधी पाणीपुरवठ्याच्या वीज बिलावर खर्च करावा लागत असल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.”
आंदोलनात विजय पाटील, संदीप पाटील, संपत पाटील, हेमंत पाटील, अरुण पवार, उपसरपंच रविकिरण बेडके, जयंत पाटील, अनंतकुमार पवार, आविष्कार पवार, माणिक देशमाने, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष अशोक पाटील, महादेव पाटील, तुळशीदास पिसे, अरुण कदम, शिवराज पाटील, संतोष बाबर, राजू पटेल सहभागी झाले.
