ईश्वरपुर लाथा-बुक्क्यांनी, रॉडने, कोयत्याने मारहाण करून एकाला जखमी केल्या प्रकरणातील चौघांना न्यायालयाने तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. सुधीर रघुनाथ पाटील (वय 34), समीर रघुनाथ पाटील (37), विशाल मधुकर गाडे (34), मिथुन बाळासाो भंडारे (37, सर्व रा.आष्टा) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. प्रथमवर्ग न्यायाधीश ए. एन. गायकवाड यांनी ही शिक्षा सुनवाली.
मारहाणीचा हा प्रकार साडेदहा वर्षापूर्वी घडला होता. यामध्ये नाभिराज आप्पासाहेब रुकडे हे जखमी झाले होते. नाभिराज रुकडे यांचे कोल्ड्रिंक्सचे गोडावूनमध्ये सुधीर पाटील हा कामगार होता. दि. 15 एप्रिल 2015 रोजी कोल्ड्रिंक्सचा एक बॉक्स कमी असल्याच्या कारणावरून दोघांच्यात वाद झाला होता. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सुधीर पाटील, समीर पाटील, विशाल गाडे, मिथुन भंडारी यांनी पुन्हा नाभिराज यांच्याशी वाद घातला.
चौघांनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी, रॉडने, कोयत्याने मारहाण केली. रुकडे यांनी आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या खटल्यात 5 साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने चौघांना दोषी धरून तीन वर्षे कारावास व 27 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील विवेकानंद पाटील यांनी काम पाहिले.
