सांगोला बसस्थानकात वाढत्या चोऱ्यांमुळे प्रवासी असुरक्षित

सांगोला तालुका हा दुष्काळ भाग म्हणून ओळखला जातो. सांगोला तालुक्यात अनेक दिवसांपासून बाजारात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. तसेच अलीकडच्या काळात बसस्थानकात देखील चोरीच्या घटना घडत आहेत. सांगोला येथील बसस्थानक आवार परिसरात प्रवाशांचे मोबाईल, पैशाचे पाकीट, दागिने यांच्या चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या चोऱ्यांबाबत पोलिसांकडे तक्रार करुनही पोलिस दुर्लक्ष करीत आहेत. यामुळे प्रवाशांमधून तीव्र नाराजी पसरली आहे.

सांगोला बसस्थानक हे सोलापूर, कोल्हापूर महामार्गावरील प्रमुख बसस्थानक आहे. सांगोलामध्ये रेल्वे स्टेशन, मोठी दोन महाविद्यालये तसेच छोटी-मोठी कॉलेज आहेत. यामुळे या बसस्थानकावर सतत प्रवाशांची मोठी गर्दी असते. गोवा, कोकण, कोल्हापूर, सांगली, कर्नाटक या भागांतून मोठ्या प्रमाणात पंढरपूर तीर्थक्षेत्रासाठी भाविक एस. टी. बसने येत असतात. या सर्व बस सांगोला बसस्थानकामध्ये पाच ते दहा मिनिटे थांबा घेतात. यामुळे या बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेऊन अनेक प्रवाशांचे मोबाईल, पैशाची पाकिटे, सोन्याचे दागिने याची चोरी मोठ्या प्रमाणात होत असते.

बसस्थानकाला लागूनच पोलिसांना थांबण्यासाठी एक ऑफीस करण्यात आले आहे. पण, या ऑफिसमध्ये एकही पोलिस दिसत नाही तसेच बसस्थानक परिसरातही पोलिस फिरकतही नाहीत. बसस्थानक परिसरात पोलिसच नसल्याने या भागात दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत आहेत. याकडे पोलिसयंत्रणा जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांना दिवसाढवळ्या लुटण्याचा प्रकार आगारात घडत आहे. त्यामुळे सांगोला बसस्थानक परिसरात होणाऱ्या भुरट्या चोऱ्यांवर आळा घालण्यासाठी बसस्थानक परिसरात पोलिस असावेत, अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.