सांगोला, करमाळ्यात स्थानिक आघाड्यांचे आव्हान; जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक, भालकेंचा आखडता हात!

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असाच सामना बहुतांश ठिकाणी दिसत आहे. सांगोला व करमाळ्यात विद्यमान आमदारांनी स्थानिक आघाडीचा झेंडा हाती घेतला आहे.

या दोन तालुक्यात स्थानिक आघाड्यांनी तगडे आव्हान दिले आहे. जिल्हा परिषदेत कोणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्यास या आघाड्यांचे महत्त्व वाढणार आहे. स्पष्ट बहुमत मिळाल्यास या आघाड्यांना फारसे महत्त्व राहणार नसल्याचा अंदाज आहे.

करमाळ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आमदार झालेले नारायण पाटील यांनी करमाळा तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांचा गट शाबूत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. शिट्टी चिन्हावर लढत असलेल्या या आघाडीचा निकाल आमदार पाटील यांच्या आगामी राजकारणाची दिशा ठरविणाराच मानला जात आहे.

भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या विरोधात आमदार पाटलांची आघाडी लढत आहे. सांगोल्याचे शेकाप आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी माजी आमदार दीपक साळुंखे यांना सोबत घेत सांगोला तालुका विकास आघाडीचा झेंडा हाती घेतला आहे. नगरपरिषद निवडणुकीला भाजपसोबत आणि जिल्हा परिषद निवडणुकीला भाजपच्या विरोधात अशी रणनीती आमदार पाटील यांनी खेळली आहे.

जिल्हा परिषदेत सत्ता मिळविण्यासाठी ३४ चा आकडा गाठणे आवश्‍यक आहे. भाजप सर्वाधिक ६० जागा लढवत आहे. दोन्ही राष्ट्रवादीने ४८ जागांवर समझोता करून उमेदवार दिले आहेत. शिवसेना जवळपास २२ जागा लढवत आहे. भाजप सर्वाधिक जागा लढवत असल्याने भाजपचे सर्वाधिक सदस्य विजयी होण्याची शक्यता आहे. भाजपला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास भाजप प्राधान्याने कोणाला सोबत घेणार? या बद्दलही कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा निकाल जिल्ह्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारा ठरण्याची शक्यता आहे.

भालकेंचा आखडता हात

तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून भगीरथ भालके यांनी पंढरपूर व मंगळवेढ्याचे नगराध्यक्षपद मिळविले. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत ही आघाडी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील सर्वच्या सर्व जागा लढेल, अशी शक्यता होती. प्रत्यक्षात मात्र भालके यांनी आघाडीच्या माध्यमातून या दोन्ही तालुक्यातील मोजक्याच जागा लढविल्या आहेत. इतर जागांवर दोन्ही राष्ट्रवादीसोबत राहण्याची त्यांनी भूमिका घेतली आहे. नगरपरिषदेतील भरघोस यशानंतरही भालके यांनी जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी आखडता हात घेतल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.