मतदानाची रणधुमाळी सुरू! जिल्हा परिषद निवडणुकीसाठी १० आगारांतून ३०० एसटी बस रवाना

गेली आठ दिवस सुरू असलेला प्रचाराचा धुरळा काल बसला आणि प्रत्यक्षात मतदानाची वेळ काही तासांवर आली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. आजपासून जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर तब्बल २० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नेमलेले कर्मचारी आणि मतदान यंत्र व साहित्य घेऊन सकाळी प्रत्येक तहसील आवारातून एसटी बस मार्गस्थ झाल्या. त्यासाठी निवडणूक विभागाकडून जिल्ह्यातील दहा आगारांच्या तब्बल ३०० बस आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एसटीला काही फेऱ्या रद्द कराव्या लागणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

निवडणूक विभागाने मतदान केंद्रनिहाय पथके तयार करून त्यांना आवश्यक साहित्याचे वितरण करण्याची आखणी पूर्ण करून मतदान यंत्रे, व्हीव्हीपॅट यंत्रणा, मतदान नोंदवही, शिक्के, ओळखपत्र पडताळणी साहित्य, सीलबंद पाकिटे आदी सर्व साहित्य निवडणूक हाताळणारे कर्मचारी, पोलिस बंदोबस्त घेऊन सकाळी आठपासून प्रत्येक तालुक्याच्या तहसील आवारातून या बसेस जिल्ह्यातील विविध मतदान मतदान केंद्रावर रवाना झाल्या.

मतदानासाठी नेमलेले कर्मचारी, साहित्य व यंत्रे केंद्रावर पाठवण्यासाठी निवडणूक विभागाने मोठ्या प्रमाणात बस आरक्षित केल्या आहेत. जिल्ह्यातील दहा आगारातून एसटी आगारांतून तब्बल ३०० बस निवडणूक कामासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. प्रत्येक बसमध्ये मतदान अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि साहित्य असे एकत्रितपणे रवाना होत होते.

प्रत्येक चालकाला मतदान केंद्रांची नावे देण्यात आली होती. एसटीच्या अधिकाऱ्यांनी बूथनिहाय संख्येद्वारे नियोजन केले. दुपारी एकपर्यंत हे साहित्य गावोगावी पोहोचवून बस प्रत्येक आगारात आल्या. उद्या (ता. ७) बस दुपारी तीननंतर काल नेमून दिलेल्या मार्गावर मतपेट्या व कर्मचाऱ्यांना आणण्यासाठी जाणार आहेत.

मतदान संपल्यानंतर सर्व गोळाबेरीज झाल्यानंतर या बस नियोजित मतमोजणीच्या ठिकाणी हे साहित्य पोहोचवतील, असे नियोजन करण्यात आले आहे. विभागीय वाहतूक अधिकारी सतीश पाटील, वाहतूक अधीक्षक प्रवीण डोंगरे, मुनीर आंबेकरी विभागीय स्तरावर वाहतुकीचे नियोजन करीत आहेत.

आगाराचे नाव आरक्षित बसेस

सांगली ——-

मिरज ५४

विटा १९

ईश्वरपूर ५८

तासगाव २९

जत ४०

आटपाडी १९

कवठेमहांकाळ २०

शिराळा २३

पलूस ३८

एकूण ३००