श्री चौंडेश्वरी प्रतिष्ठानच्या कार्यकत्यांच्या वतीने गुणवंत पदवीधर विद्यार्थी सत्कार समारंभ

ध्येयपूर्तीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहिले पाहिजे, म्हणजे आपले ध्येय गाठता येत असल्याचे मत इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी पलूस येथील श्री चौंडेश्वरी श्रावण पौर्णिमा उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या गुणवंत पदवीधर विद्यार्थी सत्कार समारंभ व बक्षीस वितरण कार्यक्रमात व्यक्त केले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विनोद तारळेकर वरिष्ठ गुप्तचर अधिकारी केंद्रीय जीएसटी संचनालय कोल्हापूर, राहुल रोकडे उपायुक्त सांगली कुपवाड मिरज महानगरपालिका, अश्विनकुमार बुचडे सहाय्यक अभियंता कुपवाड महावितरण हे उपस्थित होते. देवांग कोष्टी समाजाचे आराध्य दैवत श्री चौंडेश्वरी देवीचा श्रावण पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी सकाळी ७ वाजता देवीस अभिषेक घालण्यात आला त्यानंतर दुपारी साडेअकरा वाजता स्वर संध्या महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम संपन्न झाला.

दुपारी ४ वाजता देवीच्या पालखीची वाजत गाजत पल्लूसमधून श्री धोंडीराज महाराज मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली व त्यानंतर सायंकाळी सहा वाजता मुख्य कार्यक्रम गुणवंत पदवीधर पदव्युत्तर विद्यार्थी यांचा सत्कार समारंभ आयोजित केला. या उत्सवानिमित्त रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, मेहंदी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या, त्यांचे बक्षीस वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला. संयोजन समस्त देवांग कोष्टी समाज व श्री चौंडेश्वरी प्रतिष्ठानच्या कार्यकत्यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक सागर रेपाळ यांनी तर पाहुण्यांचा परिचय गिरीश एकार यांनी केला. आभार प्रा. सुभाष कवडे यांनी मानले.