महायुतीकडे ४ तर सांगोला तालुका विकास आघाडीकडे ३ जिल्हा परिषद गट

सांगोला – तालुक्यात ७ जि.प गट व १४ पं.स गण यासाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीचे ४ तर सांगोला तालुका विकास आघाडीचे ३ उमेदवार जिल्हा परिषद गटात विजयी झाले असून सांगोला पंचायत समितीवर १४ पैकी ९ जागांवर विजय मिळवत सांगोला तालुका विकास आघाडीने वर्चस्व मिळवले.

७ जि.प गट यामध्ये महुद बू- दादासो भगवान लवटे, जवळा- अतुल प्रभाकर पवार, कडलास- शोभाताई बाबासो खटकाळे, चोपडी- चेतनसिंह तात्यासाहेब केदार हे ४ महायुतीचे तर एखतपूर- सिंधुताई मोहन आलदर, कोळा- केराप्पा महादेव पांढरे, घेरडी- संगीता सोमा मोटे हे ३ सांगोला तालुका विकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. तसेच १४ पं.स गण यामध्ये वाकी शिवणे- स्मिता दीपक गोडसे, एखतपूर सुवर्णा संजय नवले, वाढेगाव- वंदना भारत शेळके, जवळा- पुनम सुदर्शन इंगवले, अजनाळे- बापू अशोक जावीर, कोळा- छाया सोपान कोळेकर, हातीद- अमृत नारायण पाटील, सोनंद- काजल मुकेश काशीद, घेरडी- अशोक नामदेव चोरमुले हे सांगोला तालुका विकास आघाडीचे ९ तर महूद- सोनाली उमेश पाटील, चिकमहुद- बाळासाहेब मच्छिंद्र बंडगर, कडलास- राणीताई सुरज पाटील, राजुरी- सदाशिव मारुती दबडे, चोपडी- अजय उत्तम सरगर हे महायुतीचे ५ उमेदवार विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी बी.आर.माळी व सहा.निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत यांनी विजयी उमेदवारांचे प्रमाणपत्र देऊन अभिनंदन केले.

सदर मतमोजणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहात स.१० वा. पासून सुरू करण्यात आली. यावेळी निवडणूक नायब तहसीलदार सुनील बेलभंडारे, निवासी नायब तहसीलदार सोमनाथ साळुंखे, सर्व मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, झोनल ऑफिसर, संगणक टीम, नोडल अधिकारी, मॅन्युअल टॅबिलेशन टीम, टपाली मतदान टीम, मीडिया सेलचे कमलेश सातपुते, बाबासो पाटील उपस्थित असल्याचे मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत यांनी सांगितले. याप्रसंगी सांगोला पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

महायुतीमध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट) यांचा तर सांगोला तालुका विकास आघाडी मध्ये शेतकरी कामगार पक्ष, दिपकआबा साळुंखे पाटील गट, राष्ट्रीय समाज पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांचा समावेश होता.