आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष देवराज पाटील व सरपंच हर्षवर्धन पाटील यांच्या नियोजनबद्ध रणनीतीला वाटेगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला पुन्हा यश मिळाले.
वर्चस्वही सिद्ध केले.
राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) आणि महायुती (भाजप व मित्रपक्ष) यांच्यात या गटात मुख्य लढत झाली. राष्ट्रवादी (श. प.) कडून वाटेगाव जिल्हा परिषद गटातून संध्या पाटील, वाटेगाव पंचायत समिती गणातून प्रकाश पाटील, तर रेठरे धरण गणातून रेश्मा गुरव विजयी झाल्या.
गतवेळीही वाटेगाव गटात राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले. माजी बांधकाम सभापती रवींद्र बर्डे व जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला यश मिळाले. संध्या पाटील यांचीही जिल्हा परिषदेसाठी निवड झाली. यावेळी ऐन निवडणुकीपूर्वी रवींद्र बर्डे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
त्यामुळे महायुतीचे पारडे जड झाल्याचे चित्र निर्माण झाले. तरीही आमदार जयंत पाटील यांनी कुशल राजकीय डावपेच रचत तळागाळातील कार्यकर्त्यांची प्रभावी मोट बांधली. गावभेटी, कोपरा सभा आणि थेट संवादामुळे कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण झाले.
माजी आमदार मानसिंग नाईक, शिवाजी नाईक, देवराज पाटील, हर्षवर्धन पाटील यांनीही सक्रिय सहभाग घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी शिवाजीराव नाईक यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले.
वाटेगाव गट हा शिराळा विधानसभा मतदारसंघात येत असल्याने येथे लढत नेहमीच चुरशीने होते. एका बाजूला आमदार जयंत पाटील, माजी आमदार मानसिंग नाईक, शिवाजीराव नाईक व देवराज पाटील यांची ताकद होती. तर दुसऱ्या बाजूला आमदार सत्यजित देशमुख, आमदार सदाभाऊ खोत, भाजप सम्राट महाडिक, राहुल महाडिक आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी महायुतीची धुरा सांभाळली.
