शिवजयंतीनिमित्त सांगोल्यात आजपासून विविध उपक्रम

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सांगोल्यात १७ ते २३ फेब्रुवारी दरम्यान विविध सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवप्रेमी तरुण मंडळाच्या वतीने हा सप्ताह विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा केला जाणार असून २३ फेब्रुवारीला पारंपरिक वाद्यांसह पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.शहरातील मध्यवर्ती शिवप्रेमी मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे विविध कार्यक्रम पार पडणार आहेत. मंगळवारी (ता. १७) सायंकाळी ६ वाजता शिवमंच पूजन व शिवमूर्ती प्रतिष्ठापना होणार आहे. बुधवारी (ता. १८) सायंकाळी ८.३० ते १०.३० या वेळेत ‘झेप शिवरायांची, गर्जना महाराष्ट्राची’ हा बहारदार शिवशाहूपोवाडा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम कोल्हापूरचे शिवशाहीर दिलीप सावंत सादर करणार आहेत.

गुरुवारी (ता. १९) सकाळी ६ वाजता शिवरायांच्या मूर्तीचे पूजन होणार असून, सकाळी ८ वाजता प्रतिमेस दुग्धाभिषेक व पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. शुक्रवारी (ता. २०) रोजी रक्तदान शिविर व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात
सांगोला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ आकर्षक पुतळा.आले आहे.

शनिवारी (ता. २१) सायंकाळी ८ वाजता हरवत चाललेल्या मराठमोळ्या लोककलांचा रांगडा आविष्कार असलेला ‘भूपाळी ते भैरवी’ हा कार्यक्रम रंगणार आहे. तसेच रविवारी (ता. २२) सायंकाळी ८ ते ११ या वेळेत ‘रायबा हेच का आपलं स्वराज्य’ हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सोमवारी (ता. २३) छत्रपती शिवाजी महाराजांचा पालखी सोहळा पारंपरिक वाद्यांच्या गजरात शहरातून काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत उंट, घोडे, हलगी, लेझीम, बँड तसेच सनईच्या सुरांचा समावेश असणार आहे.