गंगावेश परिसरातील ऋणमुक्तेश्वर मंदिराजवळील शुक्रतारा अपार्टमेंटमध्ये (poison) उषा मारुती भिऊंगडे वय 72 यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना सोमवारी 16 फेब्रुवारी घडली होती. त्यावेळी पोलिसांना नैसर्गिक मृत्यू न वाटता यामागे घातपात असल्याचा संशय होता. या प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर आता आजीच्या नातवाने तिचा खून केला असल्याचं उघड झालं आहे. उषा यांचा चुलत नातू प्रेम परशुराम भिऊंगडे वय 20 याने चैनीसाठी सोन्याचे दागिने लुटण्याच्या हेतूने विषारी पावडर टाकलेला चहा पाजून खून केल्याचा धक्कादायक प्रकार स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला. प्रेमला अटक करून दहा तोळे सोन्याचे दागिने जप्त केले असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उषा भिऊंगडे यांचे पती मारुती भिऊंगडे (poison)यांचे 30 डिसेंबर 2025 रोजी निधन झाले होते. मूलबाळ नसल्याने त्या गंगावेश येथील शुक्रतारा अपार्टमेंटच्या फ्लॅटमध्ये एकट्याच राहत होत्या. काही दिवसांपासून आजारी असलेल्या उषा यांची देखभाल फुलेवाडी येथील पुतण्या परशुराम भिऊंगडे हे करत होते. रविवारी 15 फेब्रुवारी रात्री परशुराम हे औषधे देऊन गेले. सोमवारी सकाळी शाहूवाडी तालुक्यात कामानिमित्त गेल्यावर सकाळी 10 वाजताच्या सुमारास उषा यांना त्यांनी फोन केला, पण प्रतिसाद मिळाला नाही. चिंतेतून शेजाऱ्यांना फोन करून घराची चौकशी करण्यास सांगितले. शेजाऱ्यांनी फ्लॅटमध्ये जाऊन बेडरूममध्ये उषा निपचित पडलेल्या आढळल्या.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू ठेवला.(poison) तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही फुटेज, शेजारी आणि नातेवाईकांकडून माहिती गोळा केली. त्यातच मृत्यूच्या सकाळी प्रेम पावणेनऊ वाजताच्या सुमारास फ्लॅटमध्ये अर्धा तास थांबून गेल्याची खबर मिळाली. मोबाइल बंद ठेवून तो अनुपस्थित असल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर प्रेमला ज्ञानसागर रेसिडेन्सी, फुलेवाडी रिंगरोड येथून ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, पण कसून चौकशीत खुनाची कबुली दिली.
