पाचेगाव खुर्द येथे मुख्य चौकात सगळीकडे माकडांचा सुरू असलेला वावर.पाचेगाव खुर्दमध्ये माकडांचा धुमाकूळ ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; बंदोबस्त करण्याची मागणी
सांगोला, ता. २२ : तालुक्यातील पाचेगाव खुर्द (ता. सांगोला) येथे गेल्या चार-पाच महिन्यांपासून माकडांच्या टोळीने धुमाकूळ घातल्याने ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, शेतकरी, महिला व ज्येष्ठ नागरिक त्रस्त झाले आहेत. माकडांनी चावा घेण्याच्या घटना घडत असल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माकडांच्या टोळीचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
सांगोला-मिरज महामार्गालगत सुमारे तीन हजार लोकसंख्या असलेल्या या गावात माध्यमिक व मराठी शाळा, विविध उद्योग-व्यवसाय तसेच परिसरात विस्तीर्ण शेती आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून सुमारे ३५ ते ४० माकडांची टोळी गावात वास्तव्यास असून सकाळपासून सायंकाळपर्यंत घरांच्या छतांवर, झाडांवर उड्या मारत उपद्रव करीत आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ व ज्येष्ठ नागरिकांवर अचानक हल्ले करून चावा घेण्याच्या घटना घडत आहेत.
काही वेळा माकडे थेट घरात घुसून महिलांच्या अंगावर धावून जात असून अन्नपदार्थांची नासधूस करीत आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या फळपिकांचे व इतर शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडतानाही भीती वाटत आहे. माकडांच्या दहशतीमुळे ग्रामस्थ अक्षरशः मेटाकुटीला आले असून एखादी जीवितहानी झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार का असा सवाल ग्रामस्थांतून उपस्थित होत आहे.
दरम्यान, सरपंच संगीता भोसले यांनी वन परिक्षेत्र कार्यालय सांगोला यांच्याकडे निवेदन देऊन माकडांच्या टोळीचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. प्रशासनाने त्वरित कार्यवाही करून गावकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
