कुणी तरी नेता काकीच्या खांद्यावर हात ठेवतो, स्टेजवर वागताना व्यवस्थित वागा… रोहित पवार यांनी कुणाला भरला दम?

राष्ट्रवादी काँग्रेसची काल मुंबईत बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली. तसेच पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचीही घोषणा करण्यात आली. मात्र, कालच्या मिटिंगमध्ये स्टेजवर अव्यवस्थितपणा होता. बड्या नेत्यांचा मान राखला जात नव्हता. या अव्यवस्थितपणावरच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हल्ला चढवला आहे. स्टेजवर वागताना व्यवस्थित वागा. सुनेत्रा काकींचा आदर ठेवा, अशा शब्दात रोहित पवार यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना दम भरला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रोहित पवार यांनी भेट घेतली. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या.

अजितदादांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा काकी आहेत. सुनेत्रा काकी उपमुख्यमंत्रीही आहेत. त्यामुळे स्टेजवर वागताना व्यवस्थित वागा. महाराष्ट्र या चार नेत्यांना पाहत आहे. दादांचा या चार नेत्यांवर वचक होता. काकींनी कुठे बसायचं याची जागा ते ठरवत होतं. कुणी तरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवत होता. महाराष्ट्रातील जनता हे सहन करणार नाही. काकींचा आदर आहे. आदर ठेवा. सांभाळून वागा आणि सांभाळून बोला, असा दमच रोहित पवार यांनी भरला.

कोणत्या स्वप्नाबद्दल, माहीत नाही…

अजित पवार यांचं अर्धवट स्वप्न पूर्ण करणार, असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या होत्या. त्यावरही रोहित पवार यांनी भाष्य केलं. अजित काका हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे होते. त्यांना आम्ही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पाहत होतो. दादा नेहमी विकासाबाबत बोलायचं. महाराष्ट्र विकासात पुढे असला पाहिजे, असं दादा नेहमी म्हणायचे. त्या स्वप्नाबद्दल काकी बोलल्या की वेगळ्या स्वप्नाबद्दल बोलल्या हे माहीत नाही. पण एफआयआर दाखल झाला पाहिजे. त्यावरच अजितदादांच्या अपघाताची चौकशी होईल, असं रोहित पवार यांनी सांगितलं.

काकींनी सांभाळून राहावं

राष्ट्रवादीच्या एका महिला आमदाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अजितदादांपासून आम्हाला दूर ठेवलं, किमान सुनेत्रा वहिनींपासून तरी दूर ठेवू नका, असं ही आमदार महिला बोलताना दिसत आहे. त्यावरही रोहित पवार यांनी भाष्य केलं. एका आमदार महिलेने बोलून दाखवलं ते व्हिडिओत आलं. हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एखाद्या आमदारालाच पक्षातील चार नेते दूर ठेवत असेल तर बाकीच्यांचं काय? दादा हे दादा असल्याने त्या गोष्टी होऊ देत नव्हते. त्यामुळे काकींनी सांभाळून राहिलं पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.