‘जिल्ह्यात २ लाख ४ हजार ८५५ ग्राहकांकडे ‘महावितरण’ची २६ कोटी तीन लाख रुपये थकबाकी आहे. यामध्ये घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीतील ग्राहकांचा समावेश आहे.
गेल्या महिन्यांत २ हजार ९२७ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे थकबाकीदार वीज ग्राहकांनी बिलांचा भरणा देय दिनांकापूर्वी करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी,’ असे आवाहन ‘महावितरण’कडून करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सांगली शहर विभागात ४२ हजार ३३ ग्राहकांकडे ०६ कोटी ५२ लाख, सांगली ग्रामीण विभागात ४१ हजार ४८८ ग्राहकांकडे ०३ कोटी ९३ लाख, ईश्वरपूर विभागात ४४ हजार २८६ ग्राहकांकडे ०७ कोटी ३१ लाख, कवठेमहांकाळ विभागात ३४ हजार ४६ ग्राहकांकडे ०३ कोटी ४७ लाख व विटा विभागात ४३ हजार १२ ग्राहकांकडे ०५ कोटी ६० लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २ हजार ९२७ ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडित केला आहे.
थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी सांगली जिल्ह्यातील ‘महावितरण’चे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र मार्च २०२६ अखेर शनिवारी, रविवारी व सार्वजनिक सुटीच्या दिवशीही कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहे. या थकीत बिलांचा त्वरित भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन केले आहे.
वीज ग्राहकांना www.mahadiscom.in या वेबसाइटवर तसेच ‘महावितरण’च्या मोबाईल अॅपद्वारे केव्हाही व कुठूनही ‘ऑनलाइन’ विनामर्यादा वीजबिलाचा भरणा करता येतो. ग्राहकांना देय रक्कमेवर ०.२५ टक्के डिजिटल वीज बिल भरणा सूट दिली जाते.
या व्यतिरिक्त महावितरणने ५ हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’द्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी आवश्यक माहितीचा तपशील संबंधित ग्राहकांच्या वीजबिलावर उपलब्ध आहे.
