टेंभू योजनेच्या विषयात गेली दीड वर्षे रखडलेला शासन आदेश आमच्या आणि शेतकऱ्यांच्या उपोषणानंतर निघाला. मग गेली दीड वर्षे शासन झोपले होते काय, असा सवाल करत खासदार संजय पाटील हे फुकटचे श्रेय घेत आहेत, असा आरोप रोहीत पाटील यांनी नाव न घेता केला.तासगाव येथे योगेवाडी येथे एम आय डी सी मंजूर करुन आणल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक नेते रोहित पाटील यांचा सत्कार व मिरवणूक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी सांगता सभेत रोहीत पाटील बोलत होते. दरम्यान तासगाव शहरातून काढण्यात आलेली मिरवणुक व जेसीबीतून फुलांचा वर्षाव करून हजारो युवकांनी आनंद व्यक्त केला.वर्ष 1997 पासून तासगाव तालुक्यात एमआयडीसी चर्चा सुरू आहे.
जिल्ह्यात सगळ्या तालुक्यात एम आय डी सी झाल्या मात्र तासगाव तालुक्यात एम आय डी सी नाही. आर आर पाटील यांनी पंच तारांकित एम आय डी सी चे नियोजन केले मात्र राजकीय विरोधाने ते होवू शकले नाही. आर आर पाटील यांच्या नंतर आमदार सुमन पाटील, रोहित पाटील यांनी हा विषय लावून धरला.अखेर योगेवाडी एम आय डी सी साठी पायाभूत सुविधा देण्याचा आदेश निघाला. या पार्श्वभूमीवर आज रोहित पाटील राष्ट्रवादी काँग्रेस आणि तालुक्यातील युवकांच्या वतीने तासगाव शहरात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
सांगली नाका येथे अभूतपूर्व उत्साहात त्यांच्यावर अक्षरशः जेसीबी मधून पुष्पवृष्टी, फटाक्यांची आतषबाजी करत स्वागत करण्यात आले. यावेळी हजारो युवक कार्यकर्ते उपस्थित होते. तासगाव शहरातील प्रमुख मार्गावरून रोहित पाटील यांची चालत मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, आर आर पाटील यांच्या पुतळ्याना त्यानी पुष्पहार घालून अभिवादन केले.