महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागांचे वाटप प्राथमिकस्तरावर झाले असून, यात उद्धव ठाकरे गटाच्या कोट्यातून दोन जागा प्रकाश आंबेडकर यांच्या ‘वंचित’ला, तर राजू शेट्टी यांना हातकणंगले लोकसभेची जागा शरद पवार गटाच्या कोट्यातून देण्यात येणार आहे.
आघाडीतील जागावाटपाचे अधिकार काँग्रेसने राज्यातल्या नेत्यांना दिले असून, लवकरच मुंबईत जागावाटपाबाबत बैठक होईल.
लोकसभेच्या जागावाटपाबाबत महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक झाली आहे. यात प्राथमिकस्तरावर जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. त्यानुसार कोणत्या पक्षाला किती जागा येतात, त्याचे वाटपही ठरले आहे. कोणत्या जागा कुणाला, याबाबत सविस्तर चर्चा राज्यातल्या नेत्यांच्या बैठकीत ठरेल.
शरद पवार गटाने हातकणंगलेच्या जागेवर दावा केला होता. या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा या जागेसाठी दावा होता. दिल्लीत प्राथमिक जे जागावाटप ठरले त्यानंतर शेट्टी यांच्यासाठी पाटील यांनी या जागेवरचा दावा सोडला आहे. काँग्रेसने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे जागावाटपाची चर्चा करण्याची जबाबदारी सोपविली आहे