सध्या केवळ देशातीलच नाही, तर संपूर्ण जगभरातील श्रीरामभक्त 22 जानेवारीची प्रतिक्षा करत आहेत. याच ऐतिहासिक दिवशी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.
या भव्य-दिव्य अशा सोहळ्याचं याचि देही याचि डोळा दर्शन घेता यावं ही सर्वांचीच इच्छा आहे. मात्र सर्वांनाच अयोध्येत उपस्थित राहणं शक्य नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील देशभरातील नागरिकांना आवाहन केलं आहे, की त्यांनी 22 जानेवारीला अयोध्येत न येता, घरीच दिवाळी साजरी करावी.
अयोध्येतील या पवित्र सोहळ्याचे साक्षीदार होण्याची तुमची इच्छा असेल, तर तुम्ही घरबसल्या देखील हा सोहळा पाहू शकता. या सोहळ्याला लाईव्ह पाहण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. या पर्यायांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.जर तुम्हाला टीव्हीवर हा कार्यक्रम पहायचा असेल, तर 22 जानेवारी रोजी सकाळपासूनच दूरदर्शनवर याचे थेट प्रक्षेपण सुरू होणार आहे.
देशाच्या कानाकोपऱ्यात या सोहळ्याचे प्रत्येक अपडेट्स पोहोचवण्यासाठी दूरदर्शनची टीम तैनात असणार आहे. यासाठी अयोध्येत ठिकठिकाणी दूरदर्शनचे सुमारे 40 कॅमेरे लावण्यात येतील. सकाळी 11 वाजेपासून या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होणार आहे. तुमच्याकडे दूरदर्शन चॅनल HD मध्ये उपलब्ध असेल, तर 4K HD क्लॅरिटीसह देखील तुम्ही हा सोहळा पाहू शकाल.
मोबाईलवर कसा पहायचा कार्यक्रम?मोबाईलवर या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. यूट्यूबवर दूरदर्शनच्या चॅनलवर देखील याचं लाईव्ह टेलिकास्ट होणार आहे.
डीडी न्यूजवर देखील याचं प्रक्षेपण करण्यात येईल.इन्स्टाग्राम, फेसबुक आणि एक्स (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राम मंदिर ट्रस्टचे अधिकृत अकाउंट तयार करण्यात आले आहेत. याठिकाणी या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण पाहता येईल.
जिओ सिनेमा या अॅपवर प्राण-प्रतिष्ठा नावाचं सेक्शन तयार करण्यात आलं आहे. याठिकाणी देखील तुम्ही या भव्य सोहळ्याचं थेट प्रक्षेपण पाहू शकता.