शिक्षणव्यवस्थेची विद्यार्थ्यांच्या हातावर ‘तुरी’

 ‘कुणी कुणाच्या हातावर तुरी दिली’, शाळेतल्या विद्यार्थांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. एक मॅडम समोर असलेल्या विद्यार्थांना विचारतात की, कुणी कुणाच्या हातावर तुरी दिली? त्यानंतर विद्यार्थांनी दिलेली उत्तरं ही भन्नाट होती. कुणी म्हणतं की औरंगजेबाने शिवाजी महाराजांच्या हातावर तुरी दिली, कुणी म्हणतंय औरंगजेबाला चांगलं वरण आवडत होतं म्हणून शिवाजी महाराजांनी त्याला तुरी दिली. हा व्हिडीओ जरी कॉमेडी वाटत असला तर त्यामागे आपल्या शिक्षणव्यवस्थेचं अपयश लपल्याचं दिसतंय. त्या मुलांची उत्तरं जरी गमतीशीर असली तरी त्या उत्तरांनी शिक्षणव्यवस्थेचं वाभाडं काढलंय. 

इतिहासात आग्र्यातून सुटका करून शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या हातावर तुरी दिली, म्हणजे तसा शब्द प्रयोग आपण वापरतो. तुरी देणं म्हणजे एखाद्याला गाफिल ठेऊन त्याची फजिती करणं असा सर्वसामान्य अर्थ होतो. पण तुरी देणं म्हणजे नेमकं काय, इथे अपेक्षित असलेल्या ‘तुरी’चा नेमका अर्थ काय हेच विद्यार्थांना कधी समजावलं नाही तर ते तुरीचा अर्थ वेगळाच घेणार, आणि आपण त्यावर हसत बसणार. त्यामुळे इतिहात शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या हातावर तुरी दिली, तशीच तुरी आताच्या शिक्षणव्यवस्थेनं मुलांच्या हातावर दिली. आपल्या मुलानं शिकावं आणि कुटुंबाला आर्थिक खाईतून बाहेर काढावं, आम्ही असं जगलो, पण आपल्या मुलांच्या वाट्याला हे नको, त्यानं शिक्षण घेऊन चांगलं जीवन जगावं अशी अपेक्षा बाळगणाऱ्या ग्रामीण भागातल्या पालकांच्या हातावर या व्यवस्थेनं तुरी दिली. 

शाळेच्या यूनिफॉर्मसाठी कपडे घेता येत नाहीत म्हणून सुट्टीच्या दिवशी मजुरी करणारी मुलं ही याच शिक्षणव्यवस्थेची बळी. अंग झाकून शाळेत जावं असं म्हणत 100 रुपयांच्या जुन्या कपड्यांच्या शोधात असलेली मुलं अन् काही हजारांचं कर्जही फिटेना म्हणून बापानं आत्महत्या केली, तरीही खचून न जाता, काबाडकष्ट करून मुलाला, मुलीला शाळेत पाठवणारी आईही याच व्यवस्थेची बळी. 

कितीही कष्ट लागेना, पै न् पै जोडू पण मुलाला शिकवू, अधिकारी बनवू आणि आपली शोषणातून मुक्तता करू अशी अपेक्षा बाळगणाऱ्या पालकांनी जर शिक्षण व्यवस्थेतील ही खरी परिस्थिती कळली तर त्यांचं हाल काय होईल? त्यांच्या आठवीतल्या मुलाला दुसरीतील भागाकार येत नाही असं समजल्यावर लढणारा बाप परिस्थिती आहे ती स्वीकारेल, त्याच्या मुलालाच दोष देईल आणि आपल्या हाताखाली उसतोड करायला नेईल, मजुरीला जुंपेल. 

भारताला गुरूकुल शिक्षणाचा इतिहास आहे. प्राचीन काळात नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्यासाठी जगभरातील लोक भारतात यायचे. आता त्याच ठिकाणच्या शिक्षणव्यवस्थेचं वाभाडं निघतंय. शिक्षणव्यवस्थेवर आज पाच टक्केही खर्च होत नाही, जो होतोय तो अनुत्पादक गोष्टींवर होतोय. हे चित्र जर बदललं नाही तर, आज तुरीच्या व्हिडीओची चर्चा होतेय, उद्या काय काय पाहावं लागेल याचा अंदाजही लावता येणार नाही.