इचलकरंजी चौंडेश्वरी देवी मंदिरात श्री बनशंकरी देवी उत्सव!

इचलकरंजीचे आराध्य दैवत श्री चौडेश्वरी देवी देवांग मंदिरमध्ये श्री बनशंकरी देवी उत्सवास गुरुवार दिनांक 18 जानेवारीपासून सुरुवात झालेली आहे. या उत्सवांमध्ये बनशंकरी देवीचे महात्म्य, पारायण, भजन, भक्ती गीते व्याख्याने, हळदीकुंकू असे अनेक उपक्रम राबविण्यात येत असतात.

बनशंकरी देवी उत्सवास महिला खूपच मोठ्या संख्येने उपस्थित असतात आणि या साजऱ्या होणाऱ्या उत्सवाचे नियोजन देखील महिलाच अगदी आनंदाने करीत असतात. आज याच उत्सवाचा मुख्य दिवस आहे म्हणजेच आज गुरुवारी 25 जानेवारी रोजी पौष पौर्णिमेला हा उत्सव साजरा होत असतो.

आज देवीला जलकुंभाभिषेक केला जातो. बाराशे ते पंधराशे महिला सकाळी सहा वाजता कडाक्याच्या थंडीमध्ये पंचगंगा नदीवरून हळदीकुंकूच्या गंधाने पाण्याने भरलेले कलश पाना फुलांनी सजवून घेऊन या महिला येतात आणि या उत्सवामध्ये मोठ्या संख्येने या महिला उस्फूर्तपणे सहभागी देखील होतात.नदीवरून या कलशांची मिरवणूक देखील काढण्यात येते. तसेच यावेळी देवीचे चित्ररथ ही असतात.

नदीवरून आणलेल्या जलकुंभातील जलाने सर्व महिला या मंगळवार पेठ येथील देवांग मंदिर येथे श्री चौंडेश्वरी देवीच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन स्वतःच्या हाताने अभिषेक करतात. तर अशा या मंगल प्रसंगी सर्वांनी अवश्य भेट द्यावी आणि पौष पौर्णिमेच्या निमित्ताने देवी दर्शनाचा सर्वांनीच लाभ घ्यावा.