गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची सविस्तर माहिती…..

भारत हा कृषी प्रधान देश असून भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासात भेटीचा मोठा वाटा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकार सतत प्रयत्नशील असते. अनेकवेळा, शेती करताना शेतकरी अपघाताला बळी पडतो किंवा त्याचा मृत्यू होतो. त्यामुळे त्या शेतकऱ्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळतो. याच पार्श्वभूमीवर शेतकरी आणि त्याच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी, उत्तर प्रदेश सरकार मुख्यमंत्री किसान अपघात कल्याण योजनेंतर्गत मदत करत आहे. त्यानुसार, शेती करताना शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास किंवा शारीरिक अपंगत्व आल्यास त्याच्या कुटुंबीयांना भरपाईच्या स्वरूपात मदत दिली जाते.

स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरु केली होती. परंतु विमा कंपनीच्या कार्यपद्धतीमुळे शासनेने या योजनेमध्ये बदल केला आहे. त्यासाठी १२० कोटी रुपयांची तरदूत केली असून या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाख रुपये मिळतील.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेबाबत योग्य पाठपुरावा करुनही विमा कंपनीच्या कार्यपद्धतीत सुधारणा होत नसल्याने या योजनेमध्ये सुधारणा करुन गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यास दि. १९ एप्रिल, २०२३ च्या शासन निर्णयानुसार मान्यता दिली आहे. यामध्ये अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी दोन लाखांचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे. यासाठी शासनाने यावर्षी १२० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू होतो किंवा काहींना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघाग्रस्त शेतकऱ्यांस, त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्यासाठी राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य (आई-वडील, शेतकऱ्यांची पती, पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे १० ते ७५ वर्ष वयोगटातील एकूण २ जणांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेच्या प्रयोजनार्थ कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेल्या एका सदस्यांमध्ये आई-वडील, शेतकऱ्यांची पती, पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यांचा समावेश ग्राह्य धरण्यात येईल. कृषि गणनेनुसार निर्धारित केलेल्या वहितीधारक खातेदार शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य असे एकूण २ जणांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत लाभ देय आहे.

देय लाभाचा तपशील – अपघाती मृत्यू झाल्यास २ लाख रुपये, अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी झाल्यास २ लाख रुपये, अपघातामुळे एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास २ लाख रुपये व अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास १ लाख रुपये आर्थिक सहाय्य देय आहे.

लाभासाठी पात्रता – या योजना कालावधीत संपूर्ण दिवसासाठी म्हणजेच विहित कालावधीतील प्रत्येक दिवसांच्या २४ तासांसाठी ही योजना लागू आहे. या कालावधीत वहितीधारक खातेदार शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य यापैकी कोणत्याही व्यक्तीला केव्हांही अपघात झाला किंवा अपंगत्व आले तरीही ते या योजनेंतर्गत लाभासाठी पात्र राहतील. या योजनेंतर्गत लाभास पात्र असणाऱ्या शेतकऱ्याने, शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने अथवा वारसदाराने शासनाच्या अन्य विभागांकडून अपघातग्रस्तांसाठी कार्यान्वित असलेल्या योजनेचा लाभ घेतला असल्यास सदर लाभार्थी गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत लाभास पात्र ठरणार नाहीत.

अपघाताचे स्वरुप  या योजनेचा लाभ घेण्यासाठी रस्ता, रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतूनाशके हाताळतांना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरुन पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचुदंश, नक्षलाईटकडून झालेल्या हत्या, जनावरांच्या हल्ल्यामुळे, चावण्यामुळे जखमी, मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू, दंगल व अन्य कोणतेही अपघात अशा या अपघाताचा समावेश आहे.

तसेच नैसर्गिक मृत्यू, विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व, आत्महत्येचा प्रयत्न, आत्महत्या किंवा जाणीवपूर्णक स्वत:ला जखमी करुन घेणे, गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करतांना झालेला अपघात, अंमली पदार्थाच्या अंमलाखाली असताना झालेला अपघात, भ्रमिष्टपणा, शरीरांतर्गत रक्तस्त्राव, मोटार शर्यतीतील अपघात, युद्ध, सैन्यातील नोकरी, जवळच्या लाभधारकाकडून खून या बाबींचा या योजनेत समावेश असणार नाही.

आवश्यक कागदपत्रे  सातबारा उतारा, मृत्यूचा दाखला, शेतकऱ्यांचे वारस म्हणून गाव कामगार तलाठ्याकडील गाव नमुना नं. ६ -क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद, शेतकऱ्यांच्या वयाच्या पडताळणीसाठी शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र तसे ज्या कागदपत्राआधारे ओळख, वयाची खात्री होईल असे कोणतेही कागदपत्रे, प्रथम माहिती अहवाल, स्थळ पंचनामा, पोलीस पाटील माहिती अहवाल, अपघाताच्या स्वरुपानुसार अंतिम विमा प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे इत्यादी कागदपत्रे गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत लाभ प्राप्त होण्यासाठी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.

जेव्हा शेतकऱ्यांचे अपघाताचे प्रकरण निदर्शनास येईल तेव्हा संबंधित अपघातग्रस्त शेतकरी, शेतकऱ्यांचे वारसदार यांनी सर्व निर्धारित कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे ३० दिवसाच्या आत सादर करावेत. यासाठी कृषी विभागाच्या सर्व क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी संबंधितांना मार्गदर्शन करतील.