मोहोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या (उपमुख्यमंत्री अजित पवार गट) तालुका अध्यक्षपदी सलग पाचव्यांदा प्रकाश चवरे यांची तर प्रांतिक सदस्य म्हणून लोकनेते साखर कारखान्याचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या निवडी करण्यात आल्या.पदाधिकारी निवडीत मोहोळ तालुक्यातील नऊ जणांची वर्णी लागली आहे.
दरम्यान तालुका व शहर कार्याध्यक्ष पद हे नव्याने निर्माण केले आहे.जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील यांनी जिल्हा कार्यकारिणीच्या नुकत्याच नव्याने निवडी केल्या आहेत. त्यात मोहोळ तालुक्यातील युवकांना मोठ्या प्रमाणात संधी दिली आहे. येत्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या निवडी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.
लोकनेते कारखान्याचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी आमदार यशवंत माने यांच्या माध्यमातून तालुक्यातील रखडलेल्या आष्टी उपसा सिंचन योजना, अनगर व दहा गावे उपसा सिंचन योजना तसेच विविध रस्ते यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला आहे. तसेच युवकांना संघटित करून पक्षवाढी साठी त्यांचे योगदान आहे.अशा विविध कार्याची दखल घेत त्यांना प्रांतीक सदस्य पदाची संधी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे यांची पाचव्यांदा तालुका अध्यक्षपदी निवड झाली आहे. पक्ष संघटन कौशल्य, पक्षाच्या माध्यमातून गावोगावच्या नागरिकांच्या शासन दरबारी असलेल्या अडचणी सोडविणे या सह पक्ष हिताच्या कामाला त्यांनी प्राधान्य दिले आहे.याची दखल घेत त्यांची निवड झाली आहे.