सोलापूर महापालिकेतील ३०२ पदांच्या भरतीसाठी १८ जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर १५ ते १७ फेब्रुवारी असे तीन दिवस ऑनलाइन लेखी परीक्षा हाेणार आहे. उमेदवारांनी महापालिकेच्या वेबसाईवरुन परीक्षा प्रवेशपत्र (हाॅल तिकिट) घ्यावे, असे आवाहन सहायक आयुक्त शशिकांत भाेसले यांनी केले.
महापालिका टीसीएस कंपनीच्या माध्यमातून नाेकर भरतीची प्रकिया राबवित आहे. विविध संवर्गातील ३०२ पदांच्या भरतीसाठी ३१ डिसेंबर २०२३ अखेर अर्ज मागविले हाेते. राज्यभरातून एकूण २३ हजार ४३० अर्ज प्राप्त झाले. लेखी परीक्षेचे केंद्र निवडण्यासाठी उमेदवारांना तीन पर्याय देण्यात आले हाेते.
पात्र उमेदवारांची छाननी सुरू आहे. उमेदवारांना एसएमएस अथवा ईमेलव्दारे परीक्षेबाबतची माहिती दिली जात आहे. महापालिकेच्या www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर recruitment notice मध्ये परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध हाेणार आहे. उमेदवारांनी परीक्षा प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यावे.
प्रवेशपत्रावर परीक्षा केंद्राची माहिती, वेळेचा उल्लेख असेल. उमेदवारांना काही शंका आल्यास टीसीएस कंपनीने दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा. प्रवेशपत्र नसल्यास उमेदवारास परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही, असेही सहायक आयुक्त भाेसले यांनी सांगितले.