मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शस्त्रक्रिया

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरातील रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली. त्यांच्या डोळ्यांना गेल्या काही दिवसांपासून त्रास होत होता. त्यानंतर डॉक्टरांकडून त्यांनी डोळ्याची तपासणी केली. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी लेझर ट्रिटमेंटद्वारे शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. शुक्रवारी सकाळी ९ वाजता शस्त्रक्रिया करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी संध्याकाळी त्यांचा नातू रुद्रांश यांचा वाढदिवस कुटुंबासोबत साजरा केला. ठाण्यातील निवासस्थानी त्यासाठी कार्यक्रम झाला. त्यानंतर शुक्रवारी त्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया झाली. ठाणे येथील माजीवाडा येथील एका प्रख्यात डॉक्टरांकडून ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती स्थिर आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चष्म्याचा नंबर बदलला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जवळचे अंधूक दिसू लागले होते. त्यामुळे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द करत शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेनंतर काही काळ विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला आहे.