प्रत्येकाला काही ना काही कारणांसाठी लोन हे घ्यावेच लागते. देशातील केंद्रीय बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shakrikanta Das) यांनी आज पुढील तिमाहीसाठी नवं पतधोरण जाहीर केलं. मागील 3 द्विमासिक पतधोरण आढाव्याच्या बैठकीमध्ये मध्यवर्ती बँकेने ‘रेपो दरा’त कोणताही बदल केलेला नसून यंदाही असाच निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीच्या काळातील तिमाहीदरम्यान व्यजदारांमध्ये कोणताही बदल होणार नाही हे स्पष्ट झालं आहे.
म्हणजेच गृहकर्ज, वाहनकर्ज किंवा वैयक्तिक कर्जाच्या ईएमआयमध्ये कोणताही बदल झालेला नाही. सध्याचा रेपो रेट हा 6.50 टक्के इतका आहे. हाच रेपो रेट पुढील पतधोरण आढाव्यापर्यंत कायम राहणार आहे. व्याजदरामध्ये कोणतीही वाढ होणार नसल्याने एकाप्रकारे ही लोकसभा निवडणुकीआधी सर्वसामान्यांना दिलेली भेट मानली जात आहे. काहींनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्याजदर कमी केली जातील अशी शक्यता व्यक्त केलेली. मात्र तसा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. आरबीआयने आपल्या पतधोरणामध्ये सलग सहाव्यांदा व्याजदर जैसे थे म्हणजेच कायम ठेवले आहेत.