इस्लामपुरात चोरट्यांचा धुमाकूळ……

अलीकडच्या काळात चोरीच्या प्रमाणात खूपच वाढ झालेली आहे. अगदी भीतीचे वातावरण सर्वत्र पसरलेले आहे. इस्लामपूर
येथील दत्तटेकडी परिसरात बंद घरांचे कुलूप फोडून दोन ठिकाणी घरफोडी झाली. चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम असा साडेतीन लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी परवेज इकबाल खतीब (वय ५०, रा. दत्तटेकडी, इस्लामपूर) यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथक बोलावले होते. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गेल्या तीन वर्षापासून परवेज हे दत्तटेकडी परिसरात राहायला आहेत. त्यांच्या घराशेजारीच त्यांची मेहुणी सलमा पुणेकर या राहायला आहेत. बुधवारी सायंकाळी परवेज हे कुटुंबासह कोल्हापूर येथे गेले होते, तर आयेशा या पतीसह इटकरे येथे माहेरी गेल्या होत्या. गुरुवारी सकाळी परवेज हे इस्लामपुरात आले, त्यावेळी त्यांना घराच्या दरवाजाचे कलूप तोडलेले दिसले. तसेच घराचा दरवाजा उघडा होता. परवेज यांनी घरात जाऊन पाहिले असता, घरातील कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. चोरट्यांनी घरातील सुमारे पावणेचार तोळ्यांचे सोन्याचे दागिने, प्लॅटिनमची चेन, ३२ हजार रुपयांची रोकड असा सुमारे २ लाख १७ हजार रुपयांचा मद्देमाल चोरट्यांनी लांबवल्याचे दिसून आले. परवेज हे सलमा यांच्या घराकडे गेले असता, त्यांच्याही घराचे दरवाजाचे कुलूप चोरट्यांनी फोडल्याचे दिसले. परवेज यांनी सलमा यांना बोलावून घेतले.


सलमा यांनी घरात जाऊन पाहिले; तेव्हा कपाटातील साहित्य विस्कटलेले होते. कपाटात ठेवलेले तीन तोळ्यांचे सोन्याचे दागिने, चांदीचे ऐवज, १० हजार रुपयांची रोकड असा १ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता. पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक हरिषचंद्र गावडे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. सांगलीहून श्वानपथक बोलावण्यात आले होते. पण श्वान घटनास्थळीच घुटमळले.