अवकाळी पावसाने विदर्भाला झोडपून काढले आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच आगामी 15 फेब्रुवारीपर्यंत विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तुरळक ते विरळ पावसासह गारपीट होण्याची देखील शक्यता वर्तविण्यात येत आहे.
भंडारा जिल्ह्यात सुमारास अवकाळी पावसासह गारपीट झाली. यात मोठ्या प्रमाणात शेत पिकांचं नुकसान झालं आहे. भंडाऱ्याच्या पहेला क्षेत्रातील चोवा, नवरगाव आणि परिसरातील गावातील नागरिकांना या अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. या अवकाळी पावसानं रब्बी हंगामातील गहू, धान पीक, चना इत्यादींसह पालेभाजी पिकांना मोठा फटका बसला आहे. टोमॅटो, वांगी, फळबागा या गारपीटमुळं अक्षरशः जमीनदोस्त झाली आहेत. तर, काही कौलारू घरांनांही नुकसानीचा सामना करावा लागला आहे. या अवकाळी पावसामुळं शेतकरी पुरता हतबल झाला असल्याचे चित्र आहे.
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्याला अवकाळी पावसासह गारपट्टीचा मोठा फटका बसला. धामणगाव तालुक्यातील देवगाव, तळेगाव, दशासर परिसरामध्ये गारपीट झाली. त्यामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. धामणगाव तालुक्याला दुपारच्या सुमारास पडलेले गारपीटीचा प्रचंड फटका बसला. त्यामुळे भाजीपाला, फळबागांचे नुकसान झालं आहे. शिवाय आज देखील सकाळपासून हवेत गारठा वाढला असून सर्वत्र धुक्याची चादर पसरली असल्याचे चित आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, सोमवारीही काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातीलअकोला,बुलढाणा अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा,नागपूर भंडारा, गोदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात आजपासून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात आजपासून पावसाच्या सरी कोसळणार आहेत. काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उर्वरित राज्यात मात्र ढगाळ वातावरण असणार आहे. विदर्भात 11 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या पाच दिवसात विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.