देशाची दिग्गज कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने अजून एक इतिहास रचला आहे. रिलायन्स कंपनी 20 लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅप असणारी पहिली कंपनी ठरली आहे. गेल्या एक आठवड्यात कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये जवळपास 1 लाख कोटींहून अधिकची वाढ झाली. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या स्टॉक्सने 19 लाख कोटी रुपयांचा आकडा ओलांडला होता. मंगळवारी BSE वर रिलायन्सने 52 आठवड्यांचा उच्चांक 2957.80 रुपये गाठला. या शेअरमध्ये 1.89 टक्क्यांची वाढ दिसून आली.
गेल्या दोन आठवड्यत कंपनीचे स्टॉक मार्केटमधील भांडवल जवळपास 1 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या स्टॉक्सने 19 लाख कोटी रुपयांचा आकडा 29 जानेवारी रोजी गाठला होता. 2024 मध्ये गुंतवणूकदारांनी रिलायन्सवर भरभरुन प्रेम केले. त्यामुळे अवघ्या काही दिवसातच रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर जवळपास 14 टक्क्यांनी वधारला.
एक दिवसांपूर्वीच हुरुन इंडिया 500 यादी जाहीर झाली. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचा दबदबा दिसून आला. कंपनी या यादीत पहिल्या स्थानावर आहे. सलग तिसऱ्या वर्षी कंपनीने हे कमाल करुन दाखवली. दुसऱ्या स्थानावर टीसीएस आणि एचडीएफसी बँक ही या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.