मागील काही दिवसांपासून हातकणंगले लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीतून जयंत पाटील यांचे चिरंजीव आणि राजारामबापू पाटील सहकारी कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या उमेदवारीची चर्चा होती.त्यादृष्टीने जोरदार हालचाली सुरू होत्या.
जयंत पाटील यांनीही लोकसभा मतदारसंघात चाचपणी केली होती. मात्र, राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्ष आणि चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला मिळाले. त्यानंतर जयंतराव राज्यभर दौरे करीत असल्याने प्रतीक यांच्या लोकसभा निवडणुकीची मोहीम थंडावली आहे.
राष्ट्रवादीतील काही नेत्यांकडूनही याबाबत ‘नो कॉमेंट्स’ म्हणून प्रतिक्रिया दिली जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार असल्याचे संकेत आहेत. तीन महिन्यांपूर्वी जयंत पाटलांचे चिरंजीव प्रतीक पाटील हे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती.
त्यादृष्टीने जयंत पाटील आणि त्यांच्या टीमकडून मतदारसंघात दौरे करून नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. प्रतीक पाटील यांच्या नावाची चर्चा हातकणंगलेमध्ये जोर धरू लागताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी स्वाभिमानीने आंदोलनाचे अस्त्र उगारले.ऊसदरासाठी धडक देत स्थापन झाल्यापासून प्रथमच राजारामबापू कारखाना एक दिवसासाठी बंद पाडला.
यावरही अध्यक्ष या नात्याने प्रतीक पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. राजू शेट्टी यांनी ऊस उत्पादकांची मोठ बांधून हातकणंगलेतून रणशिंग फुंकले आहे, परंतु भाजप आणि इंडिया आघाडी शेट्टी यांच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून असल्याने प्रतीक पाटील यांच्या उमेदवारीची चर्चा विरली आहे.
