मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा सातवा दिवस आहे. अजुनही राज्य सरकारने याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे जरांगे यांच्या मागण्यांची सरकारने तात्काळ दखल घ्यावी म्हणून वडगाव फाट्यावर सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आंदोलकांनी सोलापूर राष्ट्रीय महामार्गवर एक ते दिड तास रोखला. यामुळे या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली.
सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांची दखल गांभिर्याने व तात्काळ न घेतल्यास आणखी आंदोलन तीव्र करण्यात येईल असे मराठा आंदोलकांच्या वतीने सांगण्यात आले. या वेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता, आंदोलकांनी महामार्गावरच ठिय्या मारल्याने या ठिकाणचे वातावरण तणावपूर्ण बनले होते. दरम्यान पोलिस प्रशासनाने घटनास्थळी दाखल होत आंदोलकांना रस्ता खुला करण्याचे आवाहन केले.