सध्या निवडणुकीच्या तयारीला प्रत्येक पक्ष लागलेला आहे. अनेक नेतेमंडळीचे वेगवेगळ्या पक्षात प्रवेश सुरु आहेत. दोन दशके शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद संभाळणारे मुरलीधर जाधव शनिवारी (दि. १७) मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटात ५ हजार शिवसैनिकांसह प्रवेश करणार आहेत. माजी आमदार सुजित मिणचेकर आणि सुषमाताई अंधारे यानी माझ्याविरोधात नेत्यांचे कान भरले. त्यामुळे मातोश्री वरूनही दीड महीने झाले तरी कोणतही संपर्क नाही. त्यामुळे आपण नाराज होऊन हा निर्णय घेतल्याचे माजी जिल्हाप्रमुख, गोकुळचे संचालक मुरलीधर जाधव यानी सांगितले.
हुपरीतून भव्य रॅली काढून ५ हजार शिवसैनिक कोल्हापूर येथील मिरजकर तिकटी येथे येतील व तेथून भगवा झंझावात पदयात्रेने सभास्थानी जाईल, असे त्यानी सांगितले. मी गेली 30 वर्षे शिवसैनिक ते जिल्हाप्रमुख असा खडतर प्रवास केला. मात्र, ठाकरे गटाने जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी केली. त्यानंतर दीड महिने त्यांनी साधी चौकशीही केली नाही. मला बाजूला हो म्हटले असते, तर मी झालो असतो. मात्र हकालपट्टी करणे हे माझ्या सारख्या शिवसैनिकांला न पटणारे आहे. त्यामुळे काल राज़ीनामा दिला असल्याचे मुरलीधर जाधव यांनी सांगितले.