कोल्हापुरातील जिल्ह्यातील ‘ही’ पाच गावे दुष्काळसद़ृश

जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत कमी पाऊस पडलेल्या राज्यातील 19 जिल्ह्यांमधील 224 गावांमध्ये दुष्काळसद़ृश परिस्थिती असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.

यात कोल्हापूर जिल्ह्यातील उचगाव, गोकुळ शिरगाव, शिंगणापूर (ता. करवीर) आणि हातकणंगले तालुक्यातील कुंभोज आणि शिरोली या पाच गावांचा समावेश आहे.या निर्णयामुळे संबंधित गावांतील शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे. सहकारी कर्जाचे पुनर्गठन, जमीन महसुलात सूट आदी सवलती मिळणार आहेत.

राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील ज्या महसुली मंडलामध्ये जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या 75 टक्केपेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान 750 मि.मि.पेक्षा कमी झाले आहे आणि त्या महसुली मंडलात अद्याप पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आलेले नाही, अशा 224 नव्या गावांमध्ये (महसुली मंडलांना) दुष्काळसद़ृश परिस्थिती लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने शुक्रवारी एका शासन आदेशाद्वारे जाहीर केला आहे.