विधानसभेला होणार हायव्होल्टेज लढत….

कागल विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे निश्चित असताना महाआघाडीतील संजय घाटगे यांनी आपली तलवार म्यान केली आहे.पाच वेळा निवडून आलेल्या मुश्रीफ यांना रोखण्यासाठी शाहू ग्रुपचे सर्वेसर्वा समरजित घाटगे यांनी कंबर कसली आहे.

गेली पाच वर्षे ते अखंडपणे जनसंपर्कात आहेत.त्यांना अपक्ष लढावे लागले तर अनेक मर्यादा येऊ शकतात. त्यांच्याशिवाय महाविकास आघाडीने अन्य उमेदवार दिल्यास कागल मतदारसंघात तिरंगी लढत होऊन त्याचा लाभ मुश्रीफ यांना होऊ शकतो.

त्यामुळे महाविकास आघाडीकडून समरजित घाटगे यांनी निवडणूक लढविली तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचे पाठबळ त्यांना मिळू शकते. असे झाले तर कागलची निवडणूक हायव्होल्टेज होईल.मंत्री हसन मुश्रीफ निवडणुकीसाठी कायमपणे सज्ज आहेत. महायुतीकडून त्यांची उमेदवारीही निश्चित मानली जाते.

त्यात संजय घाटगे यांनी मुश्रीफ यांच्याबरोबर राहणार असल्याचे जाहीर करून त्यांना बळच दिले आहे. अशा स्थितीत समरजित घाटगे यांच्यासमोर अपक्ष किंवा महाविकास आघाडी असे दोनच पर्याय शिल्लक आहेत. गेल्या निवडणुकीत समरजित यांनी अपक्ष निवडणूक लढवून चांगली मते मिळवली, पण ते विजयापर्यंत पोहोचले नाहीत.